नाशिक : गंगापूरची शंभरीकडे वाटचाल ! जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर

गंगापूर धरण
गंगापूर धरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाण्याची आवक मंदावली आहे. तथापि गेल्या काही दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वर व परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे गंगापूर धरण ८८ टक्के भरले आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये आजमितीस ६२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या साठ्याशी तुलना केल्यास यंदा २४ टक्के पाण्याची तूट आहे.

ऑगस्टचा पहिला आठवडा संपुष्टात आला असताना, जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. पण त्यातही 10 दिवसांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर मध्यम हजेरी लावणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास काहीअंशी मदत झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस ४०,६९९ दलघफूवर साठा पोहचला असून, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा चार हजार ९२७ दलघफूवर पाेहोचला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत धरणामध्ये चार हजार २३० दलघफू म्हणजे ७५ टक्के साठा हाेता. धरण समूहात चारही प्रकल्प मिळून एकूण उपयुक्त साठा ७,४३० दलघफू म्हणजे ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

इगतपुरीमधील सततच्या पावसाने दारणा धरणसमूह ८७ टक्के भरला आहे. समूहातील सहा प्रकल्प मिळून पाणीसाठा १६ हजार ३८६ दलघफूवर आहे. पालखेड समूहात ४,७५४ दलघफू (५७ टक्के) साठा आहे. ओझरखेडमध्ये १,२५९ दलघफू (३९ टक्के) पाणी आहे. गिरणा खोऱ्यात चणकापूर समूह ४३ टक्के भरला असून, एकूण पाणीसाठा ६,५९४ दलघफू आहे, तर पुनदमध्ये ६६३ दलघफू (४० टक्के) भरले आहे. जिल्ह्यात पुढील वर्षापर्यंत पाणी नियोजनाच्या दृष्टीने हे चित्र फारसे आशादायक नसून, धरणांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

या धरणांमधून विसर्ग

जिल्ह्यात सध्या आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यात दारणामधून १,२५० क्यूसेक विसर्ग होत आहे. याशिवाय भावलीतून १३५, वालदेवीतून ६५, नांदूरमधमेश्वरमधून १,२११, पुणेगाव १५०, चणकापूर ६२३, हरणबारी ५२३ व केळझरच्या ७५ क्यू सेकचा यात समावेश आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news