नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरले, शहरवासीयांना थोडा दिलासा

गंगापूर धरण(छाया : हेमंत घोरपडे)
गंगापूर धरण(छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर व परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक होत आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे हे धरण ५३ टक्के भरल्याने शहरवासीयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरणांमध्ये आवक संथगतीने सुरू आहे.

जुलै महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडला, तरी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर म्हणावी तशी बॅटिंग केलेली नव्हती. मात्र, गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र काहीसे समाधानाचे वातावरण आहे. सलगच्या या पावसामुळे गंगापूर धरण भरण्यास मदत मिळाली आहे. धरणात सद्यस्थितीत २ हजार ९७८ दलघफू साठा उपलब्ध असून, त्याचे प्रमाण ५३ टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणामध्ये ६३ टक्के म्हणजेच ३,६८१ दलघफू पाणी होते. दरम्यान, धरण समूहातील काश्यपी व गौतमी-गोदावरीत प्रत्येक २८ टक्के साठा असून, आळंदी १५ टक्के भरले आहे.

इगतपुरीतील संततधारमुळे तालुक्यातील धरण समूह असलेल्या दारणाला नवसंजीवनी मिळाली. समूहातील सहा प्रकल्प मिळून १२ हजार १६५ दलघफू (६४ टक्के) पाणीसाठा आहे. समूहातील दारणा धरण ७८ टक्के भरले असून, त्यातून १,७५४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. भावली धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असून नांदूरमधमेश्वरमधून १,२५० क्यूसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये आजमितीस एकूण उपयुक्त साठा २६ हजार ३६३ दलघफू इतका असून त्याचे प्रमाण ४० टक्के आहे. २०२२ ला याच कालावधीत धरणे ८२ टक्के भरली होती. त्यावेळी एकूण साठा ५३ हजार ८७३ दलघफूवर होता. गेल्या वर्षीशी तुलना केल्यास प्रकल्पांमध्ये ४२ टक्के पाण्याची तूट आहे. धरणांची सद्यस्थिती बघता चांगल्या पावसासाठी जिल्हावासीय वरुणराजाचा धावा करत आहेत.

धरणसमूह साठा (दलघफूमध्ये)

धरणसमूह साठा टक्केवारी

गंगापूर             4,153 41

दारणा             12,165 64

पालखेड            2,438 29

ओझरखेड 731 23

चणकापूर 6192 27

पुनद             649 40

एकूण          26,363 40

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news