सटाणा : सुरेश बच्छाव
गडसेवकच्या स्वयंसेवकांनी साल्हेर येथील शिवकालीन गणपती शेंदूरमुक्त केला असून, मूर्तीने मोकळा श्वास घेतला आहे. ऐतिहासिक बागलाण तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गेल्या 10 वर्षांपासून गड संवर्धन कार्यात कार्यरत असणार्या सटाणा येथील 'गडसेवक'च्या स्वयंसेवकांनी साल्हेरच्या गणपती मूर्तीचा शेंदूर काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स 1670 मध्ये दुसर्या सूरत स्वारीनंतर बागलाण प्रांत मोहिमेचा श्रीगणेशा म्हणून साल्हेर किल्ला जिंकला. साल्हेर किल्ल्याच्या दक्षिणेला तैलाई घाटाच्या वरती मगरबारीच्या दरवाजाजवळ या गणेशाची स्थापना केली. ही गणपती मूर्ती संपूर्ण दगडात कोरून काढली असून, मोरेश्वर स्वरूपात आहे.
पूर्वी मंदिर छोटे होते आणि त्याची दुरवस्था झाली होती. पण अलीकडेच बागलाण तालुक्यातील अभियंता बी. डी. पाटील यांनी येथील घाटरस्त्याचे काम केल्यानंतर स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार केला.राजस्थानी कारागीर आणून अगदी जुन्या धाटणीचे किल्ल्याला शोभेल, असे दगडी मंदिर बांधले. पूर्वी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग येथूनच होता. त्या मार्गात अनेक घरांचे जोते, पाणी टाके आजही दिसतात. यंदा 9 फेब्रुवारी 2023 ला साल्हेर विजयाला 351 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने गडसेवकांनी एक महिना आधी श्री गणेशाला वंदन म्हणून प्राचीन मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने संवर्धन केले. पूर्वीची मूर्ती शेंदूरात पूर्ण झाकली गेली होती. साधारणपणे 47 किलो शेंदूर निघाल्यानंतर मूर्ती अतिशय सुंदर दिसायला लागली. संपूर्ण काळ्या पाषाणातील मूर्ती बघून डोळ्यांचे पारणे फिटते. तसेच मंदिरावर विधिवत कळससुद्धा बसवला. कळस बसविल्याने देवत्व जागृत होते. अलीकडेच सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरील शेंदूर याच पद्धतीने काढला गेला होता. गडसेवकांनी आजपर्यंत तालुक्यातील 23 मूर्तींचा शेंदूर काढून त्यांना पुनर्वैभव प्राप्त करून दिलेय. मूर्तींचा शेंदूर काढणे खूप गरजेचे आहे. या मूर्ती संवर्धन मोहिमेत गडसेवकचे रोहित जाधव, गणेश मोरे, धीरज जाधव, अब्दुल बोहरी, वैभव पाटील, साल्हेरचे उत्तम झोपळे, भावदास बागुल सहभागी झाले होते.
शेंदूर न काढल्यास काय होते..
मूर्तीला अतिशेंदूर लावणे आणि वरून मूर्तीमध्ये पाणी मुरणे ही प्रक्रिया भयानक आहे. त्यामुळे मूर्तीला आतून कीड लागते. आणि अशावेळी त्या मूर्तीतील देवत्व नाहीसे होऊन यक्ष, राक्षस, पिशाच्च त्या मूर्तीत वास करतात. मग नंदी दूध पिणे किंवा गणपती दूध पिणे अथवा मूर्तीची उंची आपोआप वाढणे, अशा अंधश्रद्धा वाढतात. असे चमत्कार ती देवता करत नसून त्यात वास करणारी अशुभ शक्ती करत असते आणि भोळीभाबडी जनता चमत्काराला बळी ठरून त्याठिकाणी गर्दी करते आणि अजून शेंदूर फासते. अशा मूर्ती कालांतराने जीर्ण होतात. आतील दगड दुभंगून जातो. शिल्पकाराने केलेली ती प्राचीन कलाकृती शेंदूरात संपते. मूर्तिशास्त्र असे म्हणते की, ज्या मूर्ती दुभंगून जातात त्यात देवत्व शिल्लक राहत नाही. राहतो तो फक्त दगड. पूर्वी देवाला गरम होऊ नये म्हणून चैत्र पौर्णिमेला शेंदूर लावत असत आणि पुन्हा अश्विन पौर्णिमेला हिवाळा सुरू होण्याच्या वेळी काढून घेत असत. पण आता फक्त लावलाच जातो. काढला जातच नाही. कोकणात तसेच दक्षिण भारतात कुठल्याही मूर्तीला शेंदूर लावत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील देवत्व जागृत होऊन त्या जास्त पावतात, अशी धारणा आहे. तसेच जैन धर्मीयांच्यासुद्धा कुठल्याही मूर्तीला कधीच शेंदूर लावत नाहीत.