येरवडा : पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावरून वेगाने जाणारी वाहने… त्यामधील प्रवाशांना ग्राहक बनवण्यासाठी रस्त्याच्या कडेला वेगवेगळे स्टॉल थाटून जोरजोरात येणारे रेकॉर्डिंग केलेले स्पीकरचे कर्णकर्कश आवाज… वाहतुकीला होत असलेला अडथळा… असे चित्र सध्या नगर रस्त्यावर दिसून येत आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या पथारी अतिक्रमण निरीक्षकांना हे दिसत नाही का? दिसत असेल तर यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या प्रकारची फळे, तसेच भाजीपाल्यासह इतर वस्तूंचे स्टॉल लावून विक्री करणार्या व्यावसायिकांची संख्या परिसरात दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अपघातदेखील होत आहेत.
महापालिकेचा अतिक्रमण विभाग याबाबत मूग गिळून गप्प का? हा प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहेत. नगर रस्त्यावर हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. रेकॉर्डिंग केलेले आवाज स्पीकरमधून जोरजोरात ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे. तसेच काही वाहनांमधील प्रवासी फळे व भाजीपाला घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबत असतात, यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अपघात होण्याचाही धोका आहे. पथारी, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभागाने या अनधिकृत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.