नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कंपनीच्या विक्री प्रतिनिधीने ग्राहकांकडून सुमारे पाच लाख रुपये गोळा करून ते कंपनीत जमा न करता त्यांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सचिन शर्मा (४२, रा. महात्मानगर) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात संशयित प्रीतेश देशमुख (३५) विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सचिन यांच्या फिर्यादीनसुार, सुप्रीम इक्युपमेंट कंपनीत संशयित प्रीतेश देशमुख हा विक्री प्रतिनिधी म्हणून कामास होता. २९ ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्याने कंपनीच्या व्यवहारातून नवनाथ आव्हाड यांच्याकडून तीन लाख २३ हजार रुपये, सिद्दीक खान व अजीम खान यांच्याकडून ४० हजार ३००, तर अन्य पाच जणांकडूनही हजारो रुपये असे एकूण पाच लाख नऊ हजार ९०३ रुपये घेतले. मात्र, हे पैसे कंपनीच्या खात्यात जमा न करता प्रीतेशने स्वत:साठी वापरले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
संशयित प्रीतेश याचा पोलिस तपास करीत असून, त्याचा पत्ता नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने कंपनीत भाडेतत्त्वावर राहत असलेला पत्ता दिला होता. मात्र, तेथे तो राहत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.