नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

File Photo
File Photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'वन नेशन, वन रेशन स्मार्टकार्ड' या शासकीय योजनेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने भामट्याने रावेरच्या युवकास 11 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

युवकास नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत महसूल विभागामार्फत स्मार्ट रेशनकार्डाचे काम देण्यासह महावितरणच्या नावे खोट्या वर्कऑर्डर दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकच्या ई-केंद्रातून या तरुणाला शासकीय योजनांचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित निखिल विजयानंद अहिरराव (42, रा. मखमलाबाद रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ खान आयुब खान (24, रा. ता. रावेर, जि. जळगाव) याच्या फिर्यादीनुसार, तो रावेरमधील ई-सेवा केंद्रात अर्ज नोंदणी, छपाईसह खासगी संस्थांची कामे करतो. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने फेसबुकवरील 'महाराष्ट्र उद्योजक' या पेजवर अहिरराव यांची इन्स्पायर इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीची जाहिरात बघितली होती. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह इतरत्र स्मार्ट सोलर सर्व्हे, लाइट मीटर चेंजिंग, स्मार्ट रेशनकार्ड, सोलर वॉटर टँक, ग्रामपंचायतीची कामे होतील, असे सांगितले होते. तौसिफने नाशिकमध्ये अहिररावची भेट घेतली. अहिररावचे तीन साथीदार असून, त्यांच्या आयएफएससी, आदित्य एंटरप्रायजेस, सेवातीर्थ सेवाभावी संस्था कार्यरत असल्याचे समजले. 'वन नेशन, वन रेशन' शी संबंधित कामात तौसिफने रुची दाखवली. हे काम घेतल्यास प्रतिकार्ड 90 रुपये आणि व्हेंडर नफा 42 रुपये मिळतील आणि सहा महिन्यांत काम पूर्ण न झाल्यास दंड भरावा लागेल, असेही अहिररावने तौसिफला सांगितले. तौसिफने कामापोटी 11 लाख 40 हजार रुपये संशयितास दिले. मात्र, संशयिताने वेळोवेळी अनेक कारणे देत कामे देण्यास टाळाटाळ केली.

अशी झाली फसवणूक : 19 नोव्हेंबर 2019 पासून संशयित अहिररावने तौसिफकडून रेशन स्मार्टकार्डसाठी बुकिंग रक्कम म्हणून सुरुवातीस तीन लाख रुपये घेतले. त्यानंतर तांत्रिक अडचण असून, सध्या यावल तालुक्याचेही काम द्यायचे आहे असे सांगून तौसिफकडून पुन्हा तीन लाख 50 हजार रुपये घेतले. रावेर व यावल तहसीलदार कार्यालयात कार्यवाही सुरू असून, तोपर्यंत मुक्ताईनगरचे काम देण्याच्या मोबदल्यात तौसिफकडून पुन्हा तीन लाख 50 हजार रुपये घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कामे खोळंबल्याचे सांगून जळगावच्या महावितरणची कंत्राट देतो, असे सांगत खोटी वर्कऑर्डरही दिली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news