पुणे : महापालिकेने प्रीमियम भरला 19 कोटी, लाभ चारच कोटी ! | पुढारी

पुणे : महापालिकेने प्रीमियम भरला 19 कोटी, लाभ चारच कोटी !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ अपघात विमा योजने’साठी महापालिकेने विमा कंपनीला चार वर्षात 19 कोटी 66 लाख प्रीमियम भरला असून, या योजनेचा लाभ 102 लाभार्थ्यांना 4 कोटी 54 लाख रुपये मिळाला आहे. नियमित मिळकतकर भरणार्‍या मिळकतधारकांच्या कुटुंबांसाठी महापालिकेकडून ‘पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना’ राबविली जाते. या योजनेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना 2018-19 च्या अंदाजपत्रकात तरतूद केली होती. मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रामाणिकपणे नियमित कर भरणार्‍या मिळकतधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेअंतर्गत पाच लाखांचे अर्थसाहाय्य मिळेल, असा यामागील उद्देश आहे.

शहरात दरवर्षी सुमारे 7 ते 8 लाख मिळकतधारक नियमित कर भरतात. मात्र, त्या तुलनेत या योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थींची संख्या अतिशय नगण्य आहे. या योजनेचा आतापर्यंत पाच वर्षांत केवळ 104 लाभार्थ्यांना 4 कोटी 36 लाख 80 हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे ही अपघात विमा योजना आहे. मात्र, शहरात कोरोनाचे लॉकडाउन असलेल्या 2019-20 आणि 2020-21 या दोन वर्षात अनुक्रमे 47 आणि 43 असा 90 जणांना या योजनेला लाभ मिळाला असून, उर्वरित तीन वर्षांत अवघ्या 14 जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आतापर्यंत 2 जणांना लाभ मिळाला आहे.

वर्ष प्रीमियम रक्कम लाभार्थी
2018-19 5,81,63,375 12
2019-20 6,10,29,928 47
2020-21 6,10,29,928 43
2021-22 4,62,45,800 02

Back to top button