नाशिक : तासाभराच्या पावसाने तुंबले पाणी, आयुक्तांचा चढला पारा | पुढारी

नाशिक : तासाभराच्या पावसाने तुंबले पाणी, आयुक्तांचा चढला पारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात सोमवारी (दि.10) अवघ्या तासाभरात पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मनपाच्या बांधकाम, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटी कंपनीचा असमन्वय पुन्हा एकदा समोर आला. या असमन्वयामुळेच शहरात पाणी तुंबल्याने नाशिककरांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याप्रकरणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित चारही विभागांच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी करत शिस्तभंगासह निलंबनाचा इशाराच दिला आहे.

शहरात सोमवारी (दि.10) एका तासाभरात 70 मिमी पाऊस पडला आणि संपूर्ण शहर जलमय झाले. विशेषत: जुने नाशिक आणि पंचवटी विभागातील गावठाण भागात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. यामुळे वाहतूक कोंडी तर झालीच शिवाय पादचार्‍यांसह विक्रेते, व्यापारी आणि व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले. या आधीही अशा स्वरूपाच्या पावसामुळे नाशिकमध्ये विविध ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. त्याची पुनरावृत्ती सोमवारी (दि.10) पुन्हा आली. याबाबत मनपा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी तसेच संताप व्यक्त करण्यात आल्याने आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.11) तातडीने बांधकाम विभाग, ड्रेनेज व पाणीपुरवठा तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकार्‍यांसह अभियंत्यांना बोलावून घेत बैठक घेतली. बैठकीत स्मार्ट सिटी कंपनीच्या अपूर्ण कामांमुळेच पाणी तुंबण्याचे तसेच गटाराचे पाणी गोदावरी नदीपात्रात मिसळत असल्याकडे मनपाच्या अधिकार्‍यांनी बोट दाखविले.

स्मार्ट सिटी कंपनीकडून काम करताना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नसल्याचे वा विचारणाही केली जात नसल्याकडेदेखील मनपाच्या अधिकार्‍यांनी लक्ष वेधले. त्यावर आयुक्तांनी पावसाळ्यामध्ये चारही विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत या पुढील काळात कामे करताना असमन्वय आढळून आल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

हेही वाचा :

Back to top button