नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चालू वर्षातील अखेरच्या खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्ताने मंगळवारी (दि. 8) नाशिकमधील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी दिवसभर बंद ठेवण्यात आली. यावेळी गोदाघाटावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. तर खगोलप्रेमींनी निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार 'याचि देही, याचि डोळा' अनुभवला.
खंडग्रास चंद्रग्रहणास दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी स्पर्श, तर सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी ग्रहण मोक्ष होता. पण, ग्रहणाचे वेध दुपारी 12 पासून सुरू होत असल्याने शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये सकाळीच पूजा-अर्चा पार पडली. त्यानंतर दुपारी 12 ते सायंकाळी 7 या ग्रहणकाळात मंदिरांची दारे बंद करण्यात आली. तसेच सायंकाळी 7 नंतर मंदिरे खुली करताना मंत्रोच्चाराच्या जयघोषात देवतांना महाभिषेक करण्यात आला. तसेच महाआरती करून नैवेद्य अर्पण केला. पंचवटीमधील केवडीबनातील स्वामीनारायण मंदिरदेखील ग्रहणकाळात बंद ठेवण्यात आले. रामकुंड परिसरासह गोदाघाटावर चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच स्नानासाठी गर्दी झाली. ग्रहणकाळात भाविक नदीपात्रात बसून होते. त्यामुळे अवघा परिसर भाविकांनी फुलून गेला. ग्रहणात भाविकांनी गोदावरीत स्नान करताना जपानुष्ठान आणि पूजन केले. तसेच घरोघरीदेखील ग्रहणाचे वेध पाळताना सायंकाळनंतर स्नान करून देवपूजा करण्यात आली. दरम्यान, ग्रहणकाळात शहरातील मंदिरे एकीकडे बंद ठेवण्यात आली असताना खगोलप्रेमींनी मात्र खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. ग्रहण जवळून अनुभवण्यासाठी खगोलप्रेमी व विविध संस्थांकडून शहरात ठिकठिकाणी दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय नाशिककरांनी घराचे छत, इमारतींचे टेरेस तसेच मोकळ्या मैदानांवर गर्दी केली.