पेठ; पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाट्याला बाजारभाव वाढल्याने आरणीत ठेवलेले बटाटे चोरीस जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे सातगाव पठार भागातील शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली. सद्यस्थितीत बटाटा बाजारभाव प्रती 10 किलोला 310 ते 320 रुपये इतका असल्याने बटाटे चोरीस जाऊ लागले आहेत. सातगाव पठार भागातील शेतकर्यांनी बाजारभाव वाढतील या अपेक्षेने बटाटे सुरक्षित ठेवले होते. अनेकांची शेती डोंगराच्या पायथ्याशी आहे.
या भागात 'ना घर ना वस्ती' त्यामुळे रात्री कुणीच नसल्याचा फायदा घेऊन ट्रॅक्टर नेऊन चांगले प्रतीचे बटाटे पिशव्या भरून नेण्यात येत आहेत. गणेश बाळाश्रीराम तोत्रे यांच्या गटेवाडी फाटा येथील डोंगराकडे असलेल्या बटाटा आरणमधून प्रती 50 किलोच्या 10 बटाटा गोणी चोरीस गेल्या आहेत. तर इतर ठिकाणाहून 8 गोणी बटाटे चोरीस गेल्याचे शेतकरी गणेश बाळशीराम तोत्रे यांनी सांगितले.
सातगाव पठार भागात अशा किमान 700 बटाटा आरण आहेत. या सर्व आरणी घरापासून लांब असलेल्या शेतात सुरक्षित झाकून ठेवल्या आहेत. बटाटे मोठ्या कष्टाने पावसाच्या सततच्या मार्याने वाचवले आहेत. आता मात्र चोरांनी त्याचा फायदा घेऊन शेतकर्यांना नुकसान पोहचविले आहे. मंचर पोलिसांनी याबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती करून आपल्या दूरवर असलेल्या शेतातील आरणीतील बटाटे उचलून घराजवळ आणून ठेवावे, असे आवाहन पोलिस पाटील संघटनेचे राज्य विभागीय अध्यक्ष गोरक्षनाथ नवले यांनी केले आहे