बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : "एक आमदार चून-चुनके मारण्याची भाषा करतात, आज मी तुमच्या मतदारसंघात एकटाच येतो, तुम्हीही समोरून एकटेच या", अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मेहकर येथील जाहीर सभेत शिंदे गटाचतील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना आव्हान दिले होते. यावर आमदार गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे हे मेहकरला माझ्याबाबत आव्हानाची भाषा बोलले. परंतू मी कधीही लहानांवर हात उचलत नसल्यामुळे त्यावर माझे प्रत्युत्तर नाही. काही वर्षांपूर्वी मी त्यांना खांद्यावर घेऊन लोणार सरोवर दाखवले होते. तसाही ठाकरे घराण्याबद्दल मनात आदरच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील स्थानिक ठाकरे गट व शिंदे गटात राडा झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी स्थानिक ठाकरे गटाबाबत "चून चुन के मारू"अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात या डायलॉगचा उल्लेख केला होता. मेहकरच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. तेव्हा तोच धागा पकडून आदित्य ठाकरे यांनी आमदार गायकवाड यांना आव्हान दिले. तुमच्या मतदारसंघात एकटाच येतोय, तुम्हीही समोरून एकटे या, असे आव्हान त्यांनी दिले. चून चुनके मारण्याची तुमच्यात हिंमत असती तर आमच्या छातीवर वार केले असते, पण तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या सभेनंतर आदित्य ठाकरे नियोजित दौ-यानुसार बुलढाणा मतदारसंघातून सिल्लोडकडे रवाना झाले होते. एरव्ही कोणत्याही विषयावर शिघ्रतेने, बेधडक वक्तव्य करून आमदार गायकवाड नेहमीच वाद ओढवून घेतात. आदित्य यांच्या या आव्हानावर मात्र गायकवाडांनी संयमित भूमिका घेतली.
यावर आमदार गायकवाड प्रतिक्रिया देताना म्हणाले की, २००१ मध्ये उद्धवजी लोणार सरोवर पहायला आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या लहानग्या आदित्य यांना मी खांद्यावर घेऊन सरोवर दाखवले होते. जाहीर सभेत त्यांनी आव्हानाची भाषा वापरली असली तरी मी लहानांच्या अंगावर हात उचलत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :