नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कनिष्ठ कार्यालयीन सहायक कर्मचार्यांच्या सुट्या कमी करू नये, दिवाळी बोनस मिळावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने नाशिकरोड वीज भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कनिष्ठ कार्यालयीन सहायक कर्मचार्यांच्या सुट्या कमी करणे नियमबाह्य आहे. सेवा विनियमात असे एकतर्फी बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनास नाहीत. महावितरण कंपनीला औद्योगिक विवाद कायदा लागू असून, नोटीस ऑफ चेंज न देता कामगारांना सेवा नियमाद्वारे प्रदान केलेल्या सवलती एका प्रशासकीय परिपत्रकाद्वारे कमी करता येत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कार्यालयीन सहायक यांच्या सुट्या बदलता येणार नाहीत. कारण त्यांची प्रथमदर्शनी नियुक्ती ही अतांत्रिक कर्मचारी म्हणून झाली आहे. सोबतच त्यांच्याकडे तांत्रिक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता नाही. कंपनीच्या नियमानुसार त्यांना बढतीसुद्धा कनिष्ठ लिपिक पदावर करण्यात येते. कंपनी प्रशासनाला एका अतांत्रिक कामगाराला तांत्रिक कसे काय करण्यात आले, ही प्रशासनाची चूकच आहे, ती तातडीने सुधारणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रवींद्र काडके, मोतिकर, अनिल अहिरे, विठ्ठल बागल, यु. टी. जगताप, कुलकर्णी, हर्षित काटे, संजय दुधाणे, लालित देवरे, सुनील पाटील, गणेश कुंभारे, योगिता ढोकणे आदी उपस्थित होते.