नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 40 ते 50 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधांपासून वंचित असलेल्या आनंद रोडवरील संजय गांधी झोपडपट्टीला अखेर हक्काचे पाणी मिळाले आहे. यासंदर्भात रिपाइंने सतत पाठपुरावा केल्यामुळेच कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दखल घेतल्याचे झोपडपट्टीवासीयांनी सांगितले.
आनंद रोडवर गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वी संजय गांधी झोपडपट्टी वसलेली आहे. मात्र, आजवर येथील रहिवाशांना कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधांसाठी रहिवाशांना वणवण करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन रिपाइंच्या स्थानिक पदाधिकार्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला वेळोवेळी भेट देत यासंदर्भात पाठपुरावा केला.
अखेर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने याची दखल घेत या झोपडपट्टीमध्ये दोन स्टॅण्ड पोस्टची सुविधा करून दिली आहे. इतरही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रहिवाशांनी रिपाइंच्या पदाधिकार्यांसह कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे आभार मानले.