पूर्व हवेलीत पीएमआरडीएची अतिक्रमण कारवाई गुलदस्त्यात ? | पुढारी

पूर्व हवेलीत पीएमआरडीएची अतिक्रमण कारवाई गुलदस्त्यात ?

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) पूर्व हवेलीतील अतिक्रमणांकडे होणारे दुर्लक्ष आता नागरिकांचे बळी घेऊ लागले आहे. पीएमआरडीएची अधिकार्‍यांची गदा फक्त सामान्यांवरच फिरवणार का? असा सवाल पूर्व हवेलीतून व्यक्त होऊ लागला आहे. सोमवारी (दि. 18) उरुळी कांचन येथे एका तरुणाचा पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला. अनेक ठिकाणी महापुराचा तीव्र फटका बसला आहे. या घटनांना अनधिकृत बांधकामे जबाबदार असून, वर्षोनुवर्षे काही कारवाई नाही, तर पीएमआरडीए स्थापन करून अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्यासाठी कारवाई होत नसल्याने अनधिकृत बांधकामांनी किती निष्पाप नागरिकांचे जीव घेणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पूर्व हवेलीत जमिनींना सोन्याचे भाव येऊन ओढे, नाले, शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू आहेत. या अतिक्रमणांनी ओढ्यांच्या नैसर्गिक प्रवाहांचा गळा घोटल्याचा प्रकार समोर आला आहे. उरुळी कांचन तरुणाचा बळी त्याचेच धोतक असून डोंगरमाथे, ओढेनाले अतिक्रमणांनी व्यापले आहेत. या महापुराला मानवनिर्मित कृत्ये तितक्याच प्रमाणात जबाबदार ठरत आहेत. मात्र, ज्या संस्थांना अधिकार आहेत त्या पीएमआरडीएच्या हद्दीत सर्रास अतिक्रमणांचा विळखा वाढत चालला असून, प्राधिकरण हे सर्व प्रकार डोळेबंद करून पाहत आहे का? झोपेचे सोंग घेत आहे? असे सवाल निर्माण झाले आहेत.

पीएमआरडीए अतिक्रमणांवर करीत नसलेली कारवाई, अरुंद रस्ते, अग्निशमन यंत्रणा, पीएमआरडीएचा निधी आदी सुविधांपासून सामाविष्ट क्षेत्र वंचित आहे. डोंगर टेकडी फोडून अतिक्रमणे, नैसर्गिक ओढेनाल्यांवर अतिक्रमणे, अशा ठिकाणी नियमांना सतत कात्रजचा घाट दाखवून हे सर्व प्रकार सुरू असताना पीएमआरडीए भरारी पथकांमार्फत नक्की काय करीत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

Back to top button