

नाशिक : बनावट जात वैधता प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी भारत संचार निगम लिमीटेडच्या उपमंडळ अभियंत्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर मनाेहर तरळ असे या अभियंत्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद देविदास खैरणार यांनी दिली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.
चेतना नगरला एकास मारहाण
चेतना नगर परिसरात संशयित अंकुश जाधव व दीपक बोचके यांनी हेमंत भाऊराव गायकवाड (४९, रा. चेतना नगर) यांना मारहाण केली. संशयितांनी रविवारी (दि.२६) सायंकाळी किरकोळ कारणावरून कुरापत काढून मारहाण केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार योगेश बी. परदेशी (२७, रा. अंबड लिंकरोड, चिंचोळे शिवार) याचा मृत्यू झाला. योगेश हा २२ मार्चला सातपूर औद्योगिक वसाहतीतून घरी जात होता. त्यावेळी बाबाज बेकरीजवळ अज्ञात वाहनाने योगेशच्या दुचाकीस धडक दिल्याने योगेश गंभीर जखमी झाला. गंभीर मार लागल्याने योगेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगाऱ्याविरोधात गुन्हा
देवळाली कॅम्प येथील कबुतरखाना परिसरात जुगार खेळणाऱ्या संशयितास देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मॉरिस ठाकूर असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी २२०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मॉरीस विरोधात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.