Nashik : सिडकोच्या जागा फ्री होल्ड करणार – मु‌ख्यमंत्र्यांची घोषणा, क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टरचे उद्घाटन

क्रेडाई नाशिक,www.pudhari.news
क्रेडाई नाशिक,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहराच्या सुनियोजित विकासासाठी रिंगराेडच्या अडचणी दूर करताना सिडकोच्या जागा फ्री हाेल्ड करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शहरातील मोकळे भूखंड नाममात्र दरात संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत नियमात बदल करण्यात येतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहावर आयोजित 'क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टर-२०२२'च्या उद‌्घाटनाप्रसंगी गुरुवारी (दि.२४) मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष अनंत राजेगांवकर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फर्दे, जेएलएलचे करण सोधी, क्रेडाई नाशिक मेट्राेचे अध्यक्ष रवि महाजन, गौरव ठक्कर, कुणाल पाटील, सुरेश पाटील, ललित रुंगठा, सुनील कोतवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मु‌ख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोमधील जागा फ्री हाेल्ड करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, लवकरच त्याचा निर्णय घेण्यात येईल. मोकळ्या भूखंडांच्या अवाच्या सवा दरांमुळे काही संस्थांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा भूखंडांचे भाडे कमी करण्यासाठी नियमात सुधारणा केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाशिक शहरातील पार्किंग, एफएसआयच्या मुद्यावर दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक घेतली आहे. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत संबंधितांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रिंगरोडच्या अडचणी दूर करण्यात येतील. पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावे, अशाही सूचना मु‌ख्यमंत्र्यांनी केल्या.

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी नियाेजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करू, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले. बांधकामाच्या ऑनलाइन परवानगीमधील अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. खा. गोडसे यांनी नाशिक-अहमदाबाद-उदयपूर-दिल्ली तसेच नाशिक-पुणे विमानसेवेसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. नाशिकचा सुनियाेजित विकास करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आयुक्त पुलकुंडवार यांनी राज्यातील अन्य महापालिकांच्या अभ्यासासाठी समिती गठीत केली आहे. समितीचा अहवाल पुढील आठवड्यापर्यंत हाती येईल. त्यानंतर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. रवि महाजन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.

पुणे मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना विनंती : मुख्यमंत्री शिंदे

नाशिक-पुणे अतिजलद रेल्वेमार्गाला गती देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या मार्गाच्या तत्काळ मंजुरीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विनंती करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यू-डीसीपीआर लागू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून, आपले प्रयोग अन्य राज्यांनी अवलंबिल्याचे मु‌ख्यमंत्री यांनी सांगितले.

रिंगरोडसाठी अभ्यास गरजेचा : भुसे

हैदराबादच्या धर्तीवर नाशिकमध्ये रिंगरोड तयार करण्यासाठी अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनपा व क्रेडाईने पुढाकार घेण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली. २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देतानाच मेळ्याच्या आयोजनाबाबत क्रेडाईनेही शासनास सूचना कराव्यात, असे आवाहन भुसे यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news