त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सोळा ठिकाणी सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.
माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष रवींद्र वारुणसे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, भूषण आडसरे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होेते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने मुळेगाव-अंकुश भस्मे, रोहिले-सचिन तिदमे, तळेगाव-निवृत्ती भिवसन, अस्वली हर्ष-एकनाथ शिंदे, टाके हर्ष-बाळू भस्मे, तळेगाव-नारायण पारधी, अंबई- हिरामण बुरबुडे, माळेगाव- वंदना दिवे, वेळे -देवचंद बेंडकुळी, जातेगाव बुद्रुक -संजय महाले, बेरवळ- माया बागूल, बोरीपाडा- प्रल्हाद बोरसे, बेरपाडा -कविता पवार, कोटुंबी-केशव राऊत, वरसविहीर-लक्ष्मीबाई डगळे, देवडोंगरा-मोहन गावित हे सरपंच मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मेंगाळ व तालुकाध्यक्ष रवींद्र वारुणसे यांनी गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात दौरा करून मोर्चेबांधणी केली होती.
माकपने आपला बालेकिल्ला असलेला ठाणापाडा भाग शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. याबाबत माकपचे जिल्हा सरचिटणीस यांनी सात ग्रामपंचायतींवर निर्विवाद यश मिळविल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे संपतराव सकाळे यांनी आपल्याला 40 ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचा दावा केला. त्यातील काही स्वबळावर, तर काही आघाडी करून ताब्यात ठेवल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी राष्ट्रवादीने 27 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविल्याचे म्हटले आहे. बहुजन वंचितचे उमेश सोनवणे यांनी पक्षाचे 12 सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे.