नाशिक : त्र्यंबक नाका येथील इंधनाअभावी बंद असलेला पेट्रोलपंप. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : त्र्यंबक नाका येथील इंधनाअभावी बंद असलेला पेट्रोलपंप. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : शहरभर कृत्रिम इंधनटंचाई ; वाहनधारकांमध्ये संताप

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महागाई वाढण्यास कारणीभूत ठरत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती काहीशा कमी करून केंद्र आणि राज्य सरकार यांनी वाहनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेट्रोलपंप आणि ऑइल कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यास सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याने, सध्या शहरात मोठी कृत्रिम इंधनटंचाई दिसून येत आहे. बहुतांश पेट्रोलपंपांबाहेर पेट्रोल-डिझेल संपल्याच्या पाट्या झळकत असल्याने, वाहनधारकांची मोठी पंचाईत होत आहे. विशेषत: डिझेल मिळणे दुर्लभ झाल्याने, त्याचा परिणाम व्यापार-उद्योगांवर होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील आयात शुल्क कमी केल्यानेच, मोठा तोटा होत असल्याचे कारण देऊन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सरकारी कंपनी असलेल्या बीपीसीएलनेही पंपचालकांची अडवणूक सुरू केल्याने, त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. या कंपनीवर शहरातील जवळपास 45 टक्के पंपधारक अवलंबून आहेत, तर उर्वरित 55 टक्के पंप खासगी कंपन्यांवर अवलंबून आहेत. या कंपन्यांच्या मते डिझेलवर लिटरमागे 25, तर पेट्रोलवर 15 लिटरमागे 15 रुपये तोटा होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठीच पुरवठा कमी करण्यात आला आहे. पूर्वी क्रेडिटवर या कंपन्यांकडून पंपांना इंधनाचा पुरवठा केला जायचा. मात्र, आता आगाऊ पैसे भरूनदेखील इंधन दिले जात नसल्याने, शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर इंधनाचा ठणठणाट असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या कंपन्यांच्या आठमुठ्या धोरणामुळे शहर, परिसरातील बहुतांश पंपांवर इंधन संपल्याचे बोर्ड लावले जात असल्याने, वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात एकट्या बीपीसीएलचे 150 पेट्रोलपंप असल्याने, या सर्वच पंपांवर डिझेलसह पेट्रोलची कृत्रिम टंचाई बघावयास मिळत आहे. दरम्यान, इंधनपुरवठा कंपन्यांच्या या मनमानी धोरणाबाबत त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

देशव्यापी आंदोलन – पेट्रोल डिलर्सच्या डिलर मार्जिनसाठी पेट्रोल पंपचालकांकडून मंगळवारी (दि. 31) देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन केले जाणार आहे. यात राज्यामधील साडेसहा हजार पेट्रोलपंप सहभागी होणार आहेत. अगोदरच शहरात इंधनटंचाई जाणवत असल्याने, यादिवशी बहुतांश पंपांवर पेट्रोल-डिझेल उपलब्ध होणार नाही. अशात वाहनधारकांनी वेळेआधी वाहनात इंधन भरून घ्यावे अन्यथा गैरसोय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा पेट्रोल डिलर्स संघटना आक्रमक – कंपन्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशन आक्रमक झाली असून, त्यांच्याकडून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नुकतेच निवेदन देऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच या कंपन्यांवर जीवनावश्यक वस्तूंच्या नियमाखाली गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news