वस्त्या तहानलेल्या..... पण ग्रामसेवक व कर्मचारी मात्र निवांत, पानोडीतील चित्र | पुढारी

वस्त्या तहानलेल्या..... पण ग्रामसेवक व कर्मचारी मात्र निवांत, पानोडीतील चित्र

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायतीचे नियोजनशून्य असल्याने ग्रामस्थांसह आदिवासी, मागासवर्गीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 1 कि. मी. अंतरावरून ऐन उन्हा-तान्हात पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत आहे. याप्रश्नी शासनाने त्वरित लक्ष घालून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

येथील मागासवर्गीय वस्तीवरील पाण्याच्या टाकीवरील नळ नादुरुस्त असल्याचे अनेक दिवसांपासून आढळत असतानासुद्धा कर्मचारी जणू राजेशाही थाटात वावरताना दिसतात. पाणीटंचाईबाबत पदाधिकार्‍यांसह ग्रामसेवक व कर्मचार्‍यांना गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. साडेतीन हजार लोक वस्तीच्या या गावात 50 टक्के कुटुंबे शेती व्यवसायानिमित्त मळ्यात राहू लागल्याने त्यांनी पाण्याची सुविधा विहीर, बोअरवेलच्या सहाय्याने उपलब्ध केल्या.

शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

मात्र, 50 टक्के जनता हजारवाडी, ठाकरवाडी, दलित वस्ती, आदिवासी वस्ती व गावठाणात विभागली गेली. यात ग्रामपंचायत हक्काच्या बारवेवरून गावठाण, आदिवासी, मागासवर्गीय म्हणजे 25 ते 30 टक्के लोकांना पाणी पुरविले जात आहे. बारवेचे पाणी कमी पडू नये म्हणून एप्रिल महिन्यात बोअर घेण्यात आला.

मात्र, तरीही मे महिन्याच्या अखेरीस मागासवर्गीय, आदिवासी व गावठाणातील लोकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. केवळ सरपंच, उपसंरपच, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष व कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे ऐन उन्हात लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या बारवेला व बोअरला कर्मचार्‍यांकडून पाणी असल्याचे सांगण्यात येते.

सांगली : विधवा, घटस्फोटितांशी लग्न करण्यास तयार

मात्र, नळ कनेक्शनवरील काहींना मुबलक, तर काही नळांना पाणीच येत नाही. आदिवासी, मागासवर्गीय वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने हे पाणी मुरते कोठे? याचा शोध लावण्यास पदाधिकार्‍यांसह ग्रामसेवक व कर्मचार्‍यांना वेळ नसल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून पानोडीच्या महिला पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

याला जबाबदार कोण?

गेल्या 50 वर्षांत संगमनेर तालुक्यासह आश्वी परिसरात अनेक गावांना कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या. मात्र, पानोडी गावास अद्याप पाणी पुरवठा मंजूर न होणे, हे एक कोडेच निर्माण झाले आहे. 2022 मध्ये अनेक गावांना पाणी पुरवठा मंजूर झाला. मात्र, यात पानोडी गाव दिसत नसल्याने यासाठी शासन की, ग्रामपंचायतीचा कारभार जबाबदार, अशी चर्चा झडत आहे.

 

Back to top button