नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या संकल्पनेतून व डिजिटल इंडिया या शासनाच्या धोरणानुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना विविध प्रकारचे दाखले ऑनलाइन दिले जात आहेत.
विशेष म्हणजे नागरिकांना ग्रामपंचायतीचे कर हे फोन पे, गुगल पे, पे- टीएम आदी डिजिटल पद्धतीने भरता येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीने क्यूआर कोड गावात विविध ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. त्याद्वारे कराची रक्कम भरून त्याचा स्क्रीन शॉट दिलेल्या मोबाइलवर दिल्यास त्या दिवशी त्यांना कराची पावती दिली जाणार आहे. तसेच ज्यांना थेट कार्यालयात कर भरायचा आहे, त्यांना कार्यालयात समक्ष येऊनही भरता येणार आहे. दरम्यान, सप्टेंबर अखेरपर्यंत कर भरल्यास, करात 5 टक्के सूट मिळणार आहे. दरम्यान, प्रातिनिधिक स्वरूपात मिळकतधारक रुपाली धुमाळ, ज्ञानेश्वर वडनेरे यांनी डिजिटल सेवेद्वारे कर भरणा करून या सेवेचा प्रारंभ केला. यावेळी ग्रा.पं. सदस्य गणेश बनकर, दीपक विधाते, रामकृष्ण खोडे, प्रदीप चौधरी, लिंगराज जंगम ग्रामस्थ उपस्थित होते.