इजिप्तमध्ये सापडली सोन्या-चांदीची नाणी | पुढारी

इजिप्तमध्ये सापडली सोन्या-चांदीची नाणी

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांनी एस्ना या नाईल नदीच्या काठी असलेल्या शहरातील एका मंदिरामागे उत्खनन करून सोन्या-चांदीची नाणी शोधून काढली आहेत. ही नाणी इस्लामिक काळातील आहेत. ती इसवी सन 610 पासून तेराव्या शतकापर्यंतच्या काळातील आहेत.

गेल्यावर्षी याठिकाणी उत्खनन सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या काळातील 286 चांदीची नाणी सापडली. तसेच विविध प्रकारची सोन्याची नाणीही आढळली. या नाण्यांमध्ये तेराव्या शतकातील राजा लिओ दुसरा याच्या कारकिर्दीतील आर्मेनियामधील टांकसाळीत बनलेल्या एका नाण्याचाही समावेश आहे. तसेच ओट्टोमन साम्राज्याच्या काळातील ब्राँझ व ब्रासच्या नाण्यांचाही समावेश आहे. विविध अरबी राष्ट्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या ‘दिर्‍हम’ या चांदीच्या नाण्यांचाही यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे याठिकाणी नाणी पाडण्यासाठी वापरण्यात येणारे साचे व वजनही याठिकाणी सापडले आहेत.

Back to top button