नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांत एकूण १६० लोकांवर कारवाई करत १ लाख ६१ हजार ७४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली 'हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक'साठी मनपाकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरात स्वच्छता राखण्यासासाठी भाजी मार्केट, बाजारपेठ, शहरातील विविध चौक, फुटपाथ तसेच गर्दीच्या ठिकाणी मनपाच्या भरारी पथकांकडून लक्ष ठेवले जात आहे. महापालिकेने २७ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीत १६० लोकांवर कारवाई करत जवळपास पावणेदोन लाखांचा दंड वसूल केला. त्याआधी १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत एकूण ५०७ केसेसची नोंद करून साडेसात लाखांचा दंड वसूल केला आहे.
नदी, नाल्यात केरकचरा व निर्माल्य टाकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, रस्ते मार्गावर अस्वच्छता करणे, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर घाण होणे, पालापाचोळा, प्लास्टिक, रबर आणि सर्व प्रकारचा कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, उघड्यावर लघुशंका करणे, बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकणे अशा कारणांमुळे दंडात्मक कारवाई केली जात आहे.
रस्ता अस्वच्छतेच्या जास्त केसेस
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक कारवाई ही रस्ते मार्गावर अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध झाली आहे. एकूण १९७ केसेस झाल्या असून, ५७ हजार २६० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्याखालोखाल सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्या प्रकरणी एकूण ११२ केसेस करून तीन लाख ९७ हजार ३६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नागरिकांनी तसेच विक्रेत्यांनी शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. खराब भाजीपाला, कचरा रस्त्यावर टाकू नये. कचऱ्याचे वर्गीकरण करावे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधित नागरिक किंवा आस्थापनेविरुद्ध कारवाई केली जात आहे. – डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.