शिवसेनेवर एकट्या उद्धव ठाकरेंचा हक्क कसा? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल | पुढारी

शिवसेनेवर एकट्या उद्धव ठाकरेंचा हक्क कसा? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पित्याने राजकीय पक्ष काढला म्हणून आमचाच या पक्षावर अधिकार आहे, असे होत नाही. उर्वरित दोन भावांचा देखील अधिकार नाही का? याशिवाय ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. बाळासाहेबांचा वारसा चालवणारे दोन तृतीयांश लोक शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवर एकट्याचाच हक्क सांगणे योग्य नाही, अशी सडेतोड भूमिका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. यावरून भविष्यात ठाकरे यांच्याविरोधात भाजप आणि शिंदे गट अधिक आक्रमक होणार असल्याचे उघड झाले आहे. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा, त्यांनी ठाकरेंना सुनावलेले खडेबोल यासंदर्भात बूस्टर डोस ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

आज (दि.२२) नागपुर विमानतळावर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही. इतर ठाकरे कुटुंबीयही शिंदे गटात आहेत. शिवसेना म्हणजे छत्रपतींचे नाव तुम्ही वापरले, मग त्यांचे वंशज अध्यक्ष हवे होते ना? पण प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. एकटेच उद्धव ठाकरे या पक्षावर दावा सांगत आहेत. खरेतर त्यांनी नीट पक्ष सांभाळला असता, तर ही वेळच त्यांच्यावर आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. केवळ आमच्या नावानेच लोक निवडून येतात, असा गैरसमज ठाकरे का करून घेतात? केवळ ५६ मतदारसंघांत तुमचे नाव चालते आणि इतर ठिकाणी ते नाव चालत नाही असे काही आहे का, असा रोखठोक सवालही मुनगंटीवार यांनी केला. यामुळेच भविष्यात जो कसेल त्याची जमीन, तसेच जो काम करेल, त्याचा पक्ष राहील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्यांचा पक्ष होणार नाही, असा चिमटा ठाकरे गटाला काढला.

कुठलीही निवडणूक प्रत्येक पक्ष आणि उमेदवार गांभीर्याने घेत असतो. निवडणूक काही हास्य जत्रा नाही. यामुळेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकही आम्ही असो किंवा महाविकास आघाडी सर्व गांभीर्याने लढत आहेत. जनता कोणाला आशीर्वाद देईल, हे निकालानंतर दिसणारच आहे. जनता भाजप-शिवसेनेला आशीर्वाद देईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, गायक सोनू निगम हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गृह विभाग चौकशी करीत आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Back to top button