बारामती : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी विभागाचे ऊसतोडणी नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे उसाची चिपाडे होऊ लागली आहेत. उत्पादन घटत असल्याने शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. 'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रात अजूनही आडसाली उसाची तोड सुरू आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी लवकर ऊस गाळपास जावा, यासाठी प्रयत्न करीत असताना शेतकी विभागाने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकी विभागाचा कारभार ढिसाळ पद्धतीने सुरू आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. सध्या सोमेश्वर दररोज 9 हजार टन उसाचे गाळप करीत असून, 10 ते 15 एप्रिलपर्यंत हंगाम संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जवळपास 15 ते 18 महिन्यांपासून ऊस शेतातच उभा आहे. सुरुवातीला पावसामुळे यंत्रणा यायला उशीर झाल्याने हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातच करार झालेल्या ऊसतोडणी टोळ्या आल्या नाहीत, तसेच बैलगाड्यांची संख्याही कमी झाली. यानंतर यंत्रणा सक्षम करायला फेब—ुवारी महिना उजाडला. मात्र, तोपर्यंत उसाची चिपाडे झाली. गट क्रमांक 1 आणि 3 मध्ये अजूनही आडसाली ऊसतोड सुरू आहे.
सध्या कारखान्याचे 9 लाख 68 हजार टन गाळप झाले असून, 13 ते 14 लाख गाळप करण्याचा कारखान्याचा इरादा आहे. वाहनचालकांकडून टनाला जादा पैसे घेणे, एंट्री देणे, जेवणाची सोय करणे, हार्वेस्टर यंत्रणेकडून शेतकर्यांकडेच जेवण मागणे, खराब ऊस पेटवून देणे आदी प्रकार या भागांत सुरू आहेत. गेटकेनधारकांचा ऊस गाळपास आणण्याअगोदर कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हातातोंडाला आलेला ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे. आडसाली ऊस फेब—ुवारीअखेरपर्यंत संपेल, अशी आशा आहे.