

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांदा विक्रीस सुरुवात झाली असून, गुरुवारी (दि. २४) आसरखेडे येथील पवन पवार या शेतकऱ्याच्या कांद्यास ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे सुरुवातीचे लाल कांदे खराब झाल्याने चालू वर्षी लाल कांद्याचे उत्पादन काहीसे घटले आहे. त्यामुळे अजून लाल कांदा विक्रीस कमी प्रमाणात येत आहे. सध्या, तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे लाल कांदे काढणीस आले आहेत. त्यामुळे चांदवड बाजार समितीत लाल कांदा विक्रीस येत आहे. गुरुवारी (दि. २४) आसरखेडे येथील पवन पवार या शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला असता. त्यास कांदा व्यापाऱ्यांनी ५,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले. एकीकडे लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना, दुसरीकडे उन्हाळ कांद्याचे दर मात्र एक हजार रुपयांपर्यंत खाली उतरल्याने उन्हाळ कांदे उत्पादक शेतकऱ्यात नाराजीचा सूर बघण्यास मिळाला.
उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० ते जास्तीत जास्त २,१०० रुपये, तर सरासरी १,१७० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. त्याचप्रमाणे भुसार शेतीमालाचीही अंदाजे ३,००० क्विंटलची आवक झाली होती. त्यात मका शेतीमालास कमीत कमी १,७६५ ते जास्तीत जास्त २,१११ व सरासरी १,९७० रुपये इतका भाव होता. सोयाबीनला कमीत कमी ३,००० व जास्तीत जास्त ५,५००, तर ५,३०० रुपये सरासरी भाव होता.
चांदवड बाजार समितीत शेतीमाल विक्री केल्यानंतर तत्काळ रोख स्वरूपात पेमेंट अदा केले जाते, त्यामुळे तालुक्यातील, तालुक्याबाहेरील व अन्य जिल्ह्यांतील शेतकरी बांधव चांदवड बाजार समितीत शेतीमाल विक्री करण्यासाठी येतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल सुकवून व प्रतवारी करूनच मोठ्या प्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा. तसेच माल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात घ्यावी. माल विक्री, वजनमाप अथवा पेमेंट यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीचे प्रशासक अनिल पाटील व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी केले आहे.