कोंभळीफाटा ते कर्जत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे | पुढारी

कोंभळीफाटा ते कर्जत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून संथगतीने सुरू असलेले कोंभळी फाटा-कर्जत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप भाजपचे तालुका सरचिटणीस शेखर खरमरे यांनी केला आहे. हायब्रीड अन्युटी या योजनेतून होणार्‍या रस्त्याच्या कामाची खरमरे यांनी पाहणी केली. काम गुणवत्ता पूर्ण व्हावे, म्हणून आमदार राम शिंदे यांनी कामाची पाहणी करून ठेकेदार आणि प्रशासनाला सूचना केल्या होत्या. रस्ताकामाची देखभाल दुरुस्ती करणार्‍या एजन्सीकडे 10 वर्षांसाठी असली, म्हणून काम निकृष्ट करायचे आणि मग वेळोवेळी खड्डे बुजवत बसायचे, असे नाही तर कामच गुणवत्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे, अशा शब्दांत आमदार शिंदे यांनी सुनावले होते.

कामाच्या गुणवत्तेसंबंधी संबंधित एजन्सी कानाडोळा करत असल्याबाबत खरमरे यांनी तक्रार केली होती, तक्रारीची दखल घेत बांधकाम विभागाचे उपअभियंता वाकचौरे, अभियंता शिंदे, स्वंतंत्र गुणवत्ता एजन्सी अभियंता विशाल चव्हाण यांच्या समवेत त्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात केली. पुलाच्या पाईपखाली क्राँक्रीट न टाकता फक्त मातीत पाईप टाकले आहेत. त्यासाठी कोणत्याही तांत्रिक गोष्टी पाहिल्या नाहीत. त्याचा उतार, त्याची उंची याबाबत प्रशासनालाही अंधारात ठेवून काम करण्यात आले आहे. माती बांधावरच डांबर टाकले आहे, मातीच्या ठिकाणी खडी न टाकता तसेच डांबरीकरण केले आहे. रस्त्याच्या बाजूला मातीचे भराव करून साइड पट्टी करण्यात आल्याचे खरमरे यांनी म्हटले आहे.

या सर्व गोष्टीची प्रत्यक्ष पाहणी करायला लावली आणि या कामात निश्चितपणे अनियमितता होत आहे आणि गुणवत्ता डावलून सदरहू एजन्सी काम करत आहे, असे मत अधिकारी आणि स्वतंत्र गुणवत्ता एजन्सीचे अभियंत्यांनी मान्य केले. यावेळी निकृष्ट पुलाचे काम पुन्हा आणि डांबरीकरण मातीवर न करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या. परंतु यासंदर्भात सदर एजन्सी प्रशासनाचे ऐकत नसल्याचे दिसते. प्रशासनाने ठाम भूमिका घेत गुणवत्तेसंदर्भात कोणतेही कारण चालणार नाही, अशी स्पष्ट सूचना संबंधित एजन्सीला दिली आहे. दर्जाबाबत योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन चा इशारा खरमरे यांनी दिला. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे, नंदकुमार नवले उपस्थित होते.

Back to top button