सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील उजनी येथे सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तासभर ढगफुटीसद़ृश पाऊस बरसला. परिसरातील बंधार्याचा सांडवा प्रचंड वेगाने ओसंडून वाहिल्याने पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरले. त्यात सुमारे 12 हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला. या कोंबड्या येत्या दोन दिवसांत सव्वाशे रुपये किलो दराने विक्री करण्याचे नियोजन होते. मात्र निसर्गाने घात केल्यामुळे संबंधित शेतकर्याचे सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
उजनी गावाशेजारील बंधारा महिनाभरापूर्वीच पावसाच्या पाण्याने भरला. त्यामुळे सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. सोमवारी सायंकाळी अचानक धो-धो पाऊस बरसल्याने तलावातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली. सांडव्यावरून प्रचंड वेगाने वाहणारे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले. सांडव्यालगतच मच्छिंद्र भीमाजी शिरसाट (लोहार) यांच्या शेती गट क्रमांक 147 मध्ये पोल्ट्रीफार्म आहे. त्या ठिकाणी शिरसाठ यांनी 12 हजार कोंबड्या दीड महिन्यापासून पाळलेल्या होत्या. अचानक पाणी शिरल्याने कोंबड्या नाकातोंडात पाणी जाऊन तडफडून मृत्युमुखी पडल्या. परिसरात बहुतांश शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पंचनाम्यास मुदतवाढ द्यावी
पावसामुळे उजनी परिसरात शेती पिकांची हानी झाली आहे. महसूल यंत्रणेने पंचनामे करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उजनी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
तीन एकर टोमॅटो पाण्यात
कोणत्याही कंपनीशी करार न करता शिरसाठ यांनी स्वतः 45 रुपये नग याप्रमाणे पक्षी विकत घेऊन दीड महिन्यापूर्वी 12 हजार कोंबड्या शेडमध्ये टाकल्या होत्या. या कोंबड्यांच्या संगोपनासाठी त्यांनी खाद्य व औषधांवर देखील खर्च केला होता. एका कोंबडीचे वजन सरासरी अडीच किलोच्या आसपास झाल्यावर त्यांनी 125 रुपये किलो प्रमाणे विक्री करण्याचे नियोजन केले होते. मात्र, तत्पूर्वीच निसर्गाचा प्रकोप झाल्याने शिरसाठ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच शिरसाट यांचे तीन एकर क्षेत्रात लागवड केलेले टोमॅटोचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे.