नगर तालुक्यात रोडरोमिओंना घडविणार अद्दल, दोन दामिनी पथकांची स्थापना | पुढारी

नगर तालुक्यात रोडरोमिओंना घडविणार अद्दल, दोन दामिनी पथकांची स्थापना

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील विविध गावांतील शाळा, महाविद्यालय परिसरात घोंगावणार्‍या आणि मुलींची छेड काढणार्‍या रोडरोमिओेंना आता नगर तालुका पोलिस चांगलीच अद्दल घडविणार आहे. अशा रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी नगर तालुक्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी 2 दामिनी पथके स्थापन केली आहेत. तसेच 17 शाळा, महाविद्यालयात मुलींसाठी तक्रारपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मुलींनीही न घाबरता या तक्रार पेट्यांमध्ये आपल्या तक्रारी टाकाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये 17 माध्यमिक शाळा त्यापैकी 9 महाविद्यालये आहेत.

त्यात न्यू इंग्लिश स्कूल कला कनिष्ठ महाविद्यालय वाळकी , बन्सीभाऊ म्हस्के विद्यालय- टाकळी काझी. ज्ञानदिप विद्यालय- वाळुंज, सदगुरु हायस्कुल, मेहेकरी, चांगदेव विद्यालय नारायणडोह, जनता विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय-रुईछत्तिशी, आडसूळ इंजिनिअरिंग कॉलेज- चास, रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज- चास, छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज – नेप्ती, राजारामबापू पाटील पॉलिटेक्निकल कॉलेज – मदडगाव, विश्वभरती इंजिनिअरिंग कॉलेज – सारोळा बद्धी, डॉ.ना.ज.पाऊलबुद्धे पॉलिटेक्निल कॉलेज – नारायणडोह, रयत शिक्षण संस्था हायस्कुल – चिचोंडी पाटील, अवतार मेहेरबाबा विद्यालय -अरणगाव, न्यू इंग्लिश स्कूल – गुंडेगाव, कामरगाव इंग्लिश स्कूल- कामरगाव या मोठ्या शाळा महाविद्यालयांचा समावेश आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व ठिकाणी मुलींची छेडछाड होऊ नये, तसेच मुलींच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी शाळा, कॉलेजवरील महिला कक्षात तक्रार पेटींची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या 2 दामिनी पथके स्थापन करण्यात आली आहेत. सर्व शाळा-कॉलेजमधील मुलींना समुपदेशन करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू आहे, तसेच मुलींनी घाबरून न जाता त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव दामिनी पथक समजावून सांगण्याचे काम करणार आहेत. मुलींना दामिनी पथकांचे मोबाईल क्रमांक, नोटीस बोर्डवर तसेच तक्रार पेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विनाकारण शाळा, महाविद्यालय परिसरात फिरणार्‍या रोडरोमियोंवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असल्याचे स.पो.नि. सानप यांनी सांगितले.

Back to top button