नाशिक : अवघ्या दोन महिन्यांत 117 बालकांचा मृत्यू

नाशिक : अवघ्या दोन महिन्यांत 117 बालकांचा मृत्यू

Published on

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
पुन्हा एकदा मेळघाटपेक्षा मालेगावातील बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक ठरू पाहात आहे. 2016 प्रमाणेच यंदाही परिस्थिती ओढवली असल्याचा प्राथमिक अंदाज असून, आरोग्य यंत्रणेने नागरी आरोग्याच्या द़ृष्टीने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, तसेच महापालिका व शासनाच्या आरोग्य विभागाची स्वतंत्र यंत्रणा याठिकाणी कार्यरत असताना, स्थानिक पातळीवरील या अपयशाला कारणीभूत यंत्रणेवर कारवाई करावी, यासाठी लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.

शहरातील बडा कब्रस्तान व आयशानगर कब्रस्तानमधील नोंदणीनुसार, एप्रिल आणि मे 2022 या कालावधीत आतापर्यंत तब्बल 117 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील हा मृत्यूदर मेळघाटपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात असून, 2016 या वर्षापेक्षा यावर्षी अधिक गंभीर स्थिती ओढवू शकते, हा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी 'एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी केली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2016 मध्ये 555 बालकांचा मृत्यू विविध कारणांनी झाला होता. तेव्हा हे प्रमाण 27.77 टक्के नोंदविले गेले होते. तर आता फक्त दोन महिन्यांतच 117 बालक दगावल्याने हा अभ्यास आणि तत्काळ प्रभावी उपाययोजनांचा विषय ठरला आहे. राज्यात सर्वाधिक बालमृत्यूंचे प्रमाण हे मेळघाटमध्ये असते. त्यानंतर आता मालेगावचा क्रमांक लागू पाहात असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या अपयशाविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी करणे हे महापालिकांना बंधनकारक असते. मात्र, याठिकाणी लसीकरण मोहिमांना नेहमीच विरोधाचा सामना करावा लागतो. पोलिओ असो की, कोविड प्रतिबंधक लसीकरण या दोन्ही पातळ्यांवर मालेगाव मनपाच नव्हे, तर जिल्हा यंत्रणाही प्रबोधनाच्या पातळीवर येऊन मंदावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शहरात आठ कब्रस्तान असताना, त्यातील फक्त दोनच ठिकाणी अलीकडच्या काळात 117 बालकांचा दफनविधी झाला आहे. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल आरोग्य विभागाने तयार केल्यानंतर मूळ कारणांची उकल होईल. कोविड काळातही नसलेले बालमृत्यू अचानक वाढण्यामागे कुपोषण, उष्णता की, अन्य काही निमित्त ठरले, याचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. शहर कोरोनामुक्त झाले कसे, याचा अभ्यास होत असताना, बालमृत्यूही चौकशीचा विषय आहे. गरोदर माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेल्या जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे.

शहरातील बालमृत्यूंची माहिती आरोग्य कर्मचारी व आशावर्करमार्फत घेतली जातेय. साधारण तीन – चार दिवसांत प्राथमिक माहिती संकलित होईल. त्यानंतर कारणे निष्पन्न होतील. तरी गरोदर मातांनी आरोग्य केंद्रांमधूनच तपासणी करावी. त्याठिकाणी वेळोवेळी तपासण्या होऊन एक डाटा तयार होतो. तो नंतर श्रेयस्कर ठरतो. घरी प्रसूती करु नये, रुग्णालयातच यावे. तेथूनही तत्काळ डिस्चार्ज घेऊ नये. पहिल्या तीन महिन्यांतील नोंदणी महत्त्वपूर्ण असते.  – डॉ. सपना ठाकरे, आरोग्याधिकारी, मालेगाव महानगरपालिका.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news