नाशिक : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठी मनपाकडे शहरासह उपनगरांमधून तब्बल ३२६ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून, बांधकाम, अग्निशमन, शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या ना हरकत दाखल्यानंतर १९५ मंडळांना परवानगी देण्यात आली. तर नियमांच्या अपूर्ततेसह विविध कारणांमुळे १०८ अर्ज नाकारण्यात आले.
रविवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी होणार आहे. राज्यातील सत्तापालटानंतर सुरू झालेल्या राजकारणामुळे यंदा शिवजयंतीसाठी राजकीय पक्ष, संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू आहे. शिवजयंतीसाठी पक्ष, संघटना, मंडळांनी तयारी केली आहे. महापालिकेने सण, उत्सवांसाठी मंडप धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेची नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. मनपाच्या जाहिरात विभागाने पक्ष, संघटना, मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविली. महापालिकेकडे अर्ज सादर केल्यानंतर बांधकाम, अग्निशमन विभाग, शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करून ना हरकत दाखले देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत प्राप्त ३२६ अर्जांपैकी १९५ अर्ज मान्य करून परवानगी देण्यात आली. मात्र, विविध कारणांमुळे १०८ अर्ज नाकारण्यात आले. तर २० अर्ज अद्यापही परवानगी प्रक्रियेत आहेत.
सिडकोतून सर्वाधिक अर्ज
शिवजयंतीसाठी सिडको विभागातून सर्वाधिक ८६ अर्ज मनपाकडे प्राप्त झाले. त्यापैकी ३४ अर्ज मान्य करण्यात आले. तर ४६ अर्ज नाकारले गेले. पंचवटीतील ५८ अर्जांपैकी ३१ मान्य, तर १८ अमान्य, सातपूर विभागातील ५१ पैकी सर्वाधिक ४७ मान्य तर ३ अमान्य, नाशिक पूर्व मधील ४६ पैकी २४ मान्य तर २० अमान्य, नाशिक पश्चिममधील ४३ पैकी ३० मान्य तर ९ अमान्य, नाशिकरोड विभागातील ४२ पैकी २९ अर्ज मान्य तर १२ अमान्य करण्यात आले आहेत.
हेही वाचा :