नगर : पुढारी वृत्तसेवा : ख्रिश्चन धर्मगुरू, फादर्स व चर्चवर वारंवार होणारे हल्ले, त्यांच्यावर होणारे धर्मांतराचे खोटे आरोप लावून विविध खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविणे, चर्चेसची मोडतोड करणे, प्रभू भोजनासारख्या धार्मिक विधींमध्ये व्यत्यय आणून पवित्र विधीची विटंबना मूठभर समाजकंटकांकडून अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित मूकमोर्चामध्ये जिल्हाभरातील सकल ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल मैदान, स्टेशन रोड येथून मार्केट यार्ड चौक-बंगालचौकी-माणिक चौक-अर्बन बँकमार्गे नवीपेठ नेता सुभाष चौक – तेलीखुंट चौक कापड बाजार मार्गे करबीवाला चौक भंडारी (जनरल स्टोअर्स) चौक जुने कलेक्टर ऑफिसमध्ये प्रांत अधिकारी बालाजी शिरसागर यांना निवेदन दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, बिशप शमुवेल भिंगारदिवे, बिशप शरद गायकवाड, बिशप एम.एस. सावंत, बिशप तानाजी पाडळे, बिशप शमुवेल भिंगारदिवे, जॉन्सन शेस्कपिअर, प्रा. डॅनियल काळोखे, फादर ब्रिस्टन बिटटो, पी. जी. मकासरे, डॉ. जॉन प्रभाकर, जे. आर. वाघमारे, डी. डी. सोनावणे, दीपक पाडळे, तेजपाल उजागरे, ताराचंद चक्रनारायन, डॉ. जॉन उजागरे, मेजर देवदान कळकुंभे, अॅड. योहान मकासरे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय असून देशावर व मानव जातीवर प्रेम करणार आहे. नगर जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. काही समाजकंटक दूषित वातावरण निर्माण करण्यासाठी जाणून बुजून काही घटना घडवून आणतात. अधिवेशनाच्या काळात ख्रिस्ती बांधवांचे विविध प्रश्न राज्य सरकारकडे मांडणार आहे.
बिशप शमुवेल भिंगारदिवे म्हणाले की, ख्रिस्ती धर्म हा शांतीचा, प्रीतीचा व संयमाचा धर्म असून समाजामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मूक मोर्चा कुठल्याही पक्षाच्या,जातीच्या, धर्माच्या विरोधात नसून, धर्मगुरू, चर्चवरील हल्ले करणार्या मूठभर समाजकंटकाच्या विरोधात आहे. यावेळी ख्रिस्ती धर्मगुरू व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.