

नंदुरबार - नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेला मिळालेला विजय हिंदुत्वाचा नसून वोट जिहादचा आहे; असा घणघाती आरोप भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भाजपाचा विजय होणार असे लक्षात घेऊन भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी एमआयएम सारख्या कट्टर पक्षासोबत छुपी हात मिळवणी केली; असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नंदुरबार नगरपालिका निवडणूक निकाल तीन दिवसापूर्वी घोषित झाले असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी वीस वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखणारा विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत अत्यंत नवख्या उमेदवारांना घेऊन भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन जय पराजयाचे विश्लेषण मांडले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीतून विजयी झालेले तसेच पराभूत झालेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीतून निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक आनंदा माळी यांची गटनेतेपदी तर हिरालाल चौधरी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली असल्याची माहिती देऊन त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही पूर्णतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. त्या उलट नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत ज्यांनी विजय प्राप्त केला ते सत्ताधारी निव्वळ मुस्लिम मतांच्या आधारावर जिंकून आले आहेत. हिंदू मतांचा जनाधार त्यांना लाभलेला नाही. आमच्या विरोधकांना मिळालेला विजय हिंदु मतांचा नसून वोटजिहादचा विजय आहे.
कारण अन्य मुस्लिम मतदार समोर असताना सुद्धा मुस्लिम बांधवांनी त्यांना मतदान केलेले नाही परंतु प्रत्येक प्रभागात रघुवंशी यांच्या उमेदवारांना एक गठ्ठा मतदान झालेले आहे. डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या की, त्यासाठी एम आय एम सारख्या धर्मवादी पार्टीशी रघुवंशी यांनी छुपी युती केल्याचं लक्षात येते. एम आय एम च्या उमेदवारांना मिळालेली एकूण मतं 10 हजार 179 आहेत. खाली एम आय एम ला आणि वरती नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला अशी मुस्लिम मतांची विभागणी झाली. परिणामी भाजपा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अकरा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला. भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठीच हे घडवले गेले. रघुवंशी फक्त नावापुरते हिंदुत्ववादी पक्षाचे नेते आहेत परंतु खरोखरचे ते पूर्णतः काँग्रेसची विचारांचे काम पुढे नेत आहेत, असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.
वोट जिहादचा मुद्दा स्पष्ट करताना त्यापुढे म्हणाले की, नंदुरबार नगरपालिका क्षेत्रात एकूण मतदान 75 हजार इतके झाले. त्यातील मुस्लिम आणि इतर मते वगळता जवळपास 54 हजार मतं हिंदूंची होती. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश माळी यांना 30 हजार 531 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार सौ रत्ना रघुवंशी यांना 41 हजार 641 मते मिळाली आहेत. रघुवंशी यांना प्राप्त झालेल्या या 41 हजार मतांमध्ये जवळपास 18 हजार इतकी एकट्या मुस्लिम मतदारांची आहेत. म्हणजे फक्त 24 हजार 641 हिंदूंची मते रघुवंशी यांना मिळाली. त्या उलट भाजपाचे अविनाश माळी यांना 54 हजार हिंदू मतांपैकी तब्बल 30 हजार 531 मते मिळाली आहेत.
नगराध्यक्ष पदाला मिळालेल्या मतांमध्ये 11000 मतांचा फरक पडला असला तरी, परिवर्तन घडवण्यासाठी नंदुरबार शहरातील हिंदू प्रेमी मतदार आमच्या पाठीशी संघटित झाले होते, हे स्पष्ट दिसते, असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. भारतीय जनता पार्टीने उभ्या केलेल्या 41 उमेदवारांपैकी तब्बल 26 उमेदवार नव्या दमाचे होते आणि त्यातील बहुतांश उमेदवार थोड्याशा मतांमुळे पराभूत झाले. नंदुरबार नगर परिषदेत पहिल्यांदाच चार नगरसेवक एम आय एम चे निवडून गेले. विशिष्ट समुदायाचे मतदार संघटित होतात आणि नंदुरबारच्या रस्त्यावर पहिल्यांदाच हिरवा गुलाल उधळला जातो ही धोक्याची घंटा आहे; असेही मत डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकारांसमोर बोलताना मांडले.