

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय बुधवार (दि.24) रोजी आज संपला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. नवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर काँग्रेससह नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना गुजरातमधील बारडोली येथील गांधी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नवापूर येथे उपचारासाठी आणले असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामपंचायतीचे सरपंचपासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात
सुरुपसिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी बहुल गावात झाला. 1962 साली सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1965 मध्ये ते धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 11 मार्च 1972 रोजी नवापूर विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले.
पहिले खाते - समाजकल्याण व आदिवासी विकास
आणीबाणीच्या काळातील त्यांच्या कार्याची दखल घेत 1977 मध्ये त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवारी मिळाली. 1980 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले. खासदार असतानाच 25 सप्टेंबर 1980 रोजी इंदिरा गांधी यांनी त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली. समाजकल्याण व आदिवासी विकास हे त्यांचे पहिले खाते होते.
नंदुरबारला बनवले काँग्रेसचा बालेकिल्ला
1985 पासून 2009 पर्यंत ते सातत्याने नवापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले. या काळात त्यांनी आदिवासी विकास, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वन आणि बंदरे अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद भूषवले. नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
2009 मध्ये शरद गावित यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र हार न मानता त्यांनी 2014 मध्ये पुन्हा विजय मिळवला. वाढते वय लक्षात घेता 2019 आणि 2024 मध्ये त्यांच्या चिरंजीव शिरीष नाईक यांनी काँग्रेसतर्फे नवापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
शिक्षण आणि सहकार क्षेत्रातही सुरुपसिंग नाईक यांचे योगदान उल्लेखनीय आहे. आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नवापूर तालुक्यात शिक्षणसंस्थांचे जाळे उभे केले. आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे यांच्या पायाभरणीतही त्यांचा पुढाकार होता. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विकासकामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला.
गांधी परीवाराचे सच्चे सेवक म्हणून ओळख
गांधी कुटुंबाशी त्यांची निष्ठा सर्वश्रुत होती. इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होत असे. त्यांच्या निधनामुळे नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विविध स्तरांतून शोकभावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, पाच मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चिरंजीव शिरीष नाईक हे सध्या नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर सून रजनी नाईक यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. अजित नाईक आणि दीपक नाईक हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिले आहेत.
सुरुपसिंग नाईक यांच्यावर उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता नवापूर तालुक्यातील नवागाव येथे त्यांच्या राहत्या घरातून अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा निघणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवी, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व हरपले असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे लढवय्ये नेते होते. दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध खात्यांचा कार्यभार समर्थपणे सांभाळत आदिवासी विकास, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले. नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. साधी जीवनशैली आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे ते ‘जनतेचे आमदार’ म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एका अनुभवी, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेत्याच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. आदिवासी, ग्रामीण व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असेही अजित पवार यांनी नमूद केले. या दुःखद प्रसंगी नाईक कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.