Apple Pay India: भारतात Apple Pay सुरू होणार! GPay आणि PhonePeचं टेन्शन वाढलं; काय असणार खास?

Apple Pay India: Apple ऑक्टोबर 2026 मध्ये भारतात Apple Pay सेवा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
Apple Pay India
Apple Pay IndiaPudhari
Published on
Updated on

Apple Pay India: Apple Pay भारतात लाँच होण्याच्या चर्चांना आता वेग आला आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple ऑक्टोबर 2026 मध्ये भारतात आपली पेमेंट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला Axis Bank चे क्रेडिट कार्ड Apple Payशी करार करण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर बँकांच्या कार्डांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत Apple Pay ची सुरुवात 2014 मध्ये झाली होती. मात्र, भारतात ही सेवा येण्यासाठी जवळपास 12 वर्षांचा कालावधी लागला. भारतातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंट बाजारपेठेचा विचार करता Apple साठी ही एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे.

Apple Pay भारतात नेमकं कसं काम करणार?

Apple Pay मध्ये कार्ड जोडल्यानंतर युजर्सला दुकानातील कॉन्टॅक्टलेस कार्ड मशीनजवळ iPhone किंवा Apple Watch नेऊन पेमेंट करता येईल. iPhone वर Face ID किंवा Touch ID द्वारे व्यवहार पूर्ण होईल.

यासाठी प्रत्येक वेळी वेगळं पेमेंट अॅप उघडण्याची गरज भासणार नाही. Apple Pay कार्डची माहिती डिव्हाइसमध्ये सुरक्षित ठेवते आणि व्यवहाराच्या वेळी प्रत्यक्ष कार्ड नंबर दुकानदारासोबत शेअर केला जात नाही.

म्हणजेच, सध्या क्रेडिट कार्ड मशीनवर कार्ड टॅप करून ज्या पद्धतीने पेमेंट केले जाते, त्याच धर्तीवर iPhone किंवा Apple Watch वापरून पेमेंट करता येईल.

सुरुवातीला Axis Bank च्या कार्डपुरती मर्यादा?

रिपोर्ट्सनुसार, भारतातील Apple Pay च्या सुरुवातीच्या टप्प्यात Axis Bank च्या क्रेडिट कार्डचा समावेश होऊ शकतो. Apple ची HDFC Bank आणि ICICI Bank यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बँकांसोबत पेमेंटशी संबंधित सर्व अटी अद्याप अंतिम झालेल्या नसल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

Axis Bank कडे जुलैपर्यंत सुमारे 1.63 कोटी क्रेडिट कार्ड्स असल्याचे सांगितले जातआहे. त्यामुळे Apple Pay च्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी Apple ला मोठा ग्राहकवर्ग मिळू शकतो.

मात्र, Apple Pay लाँच होताच भारतातील सर्व बँकांची क्रेडिट कार्ड्स त्यावर उपलब्ध होतील, याची शक्यता कमी आहे. सुरुवातीला काही निवडक बँका आणि कार्ड्सपुरतीच सेवा मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

UPI नसेल तर Apple Pay कितपत उपयोगी ठरणार?

भारतामध्ये Apple Pay समोरचा सर्वात मोठा प्रश्न UPI सपोर्टचा आहे. भारतात चहा किंवा नाश्त्याच्या छोट्या दुकानापासून मोठ्या मॉलपर्यंत QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट केलं जात. ऑगस्ट 2026 मध्ये UPI वर 24.5 अब्जांहून अधिक व्यवहार झाल्याचे आकडे सांगतात. देशातील डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा सुमारे 84 टक्के आहे.

अशा परिस्थितीत Apple Pay ची सुरुवात केवळ क्रेडिट कार्ड पेमेंटपासून झाली, तर त्याचा वापर मुख्यतः क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या iPhone ग्राहकांपुरता मर्यादित राहू शकतो.

उदाहरणार्थ, एखाद्या दुकानात कॉन्टॅक्टलेस कार्ड मशीन असेल, तर iPhone वापरून Apple Pay द्वारे पेमेंट करता येईल. मात्र, दुकानदाराकडे फक्त UPI QR कोड असेल आणि कार्ड मशीन नसेल, तर सुरुवातीला Apple Pay मधून तो QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करता येईलच याची खात्री नाही.

Apple Pay च्या UPI सपोर्टबाबत सस्पेंस कायम

भारतामध्ये Apple Pay कशा स्वरूपात लाँच होणार, याबाबत सध्या पूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही.

Reuters च्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला Axis Bank च्या क्रेडिट कार्डपासून Apple Pay ची सुरुवात होऊ शकते. मात्र, सुरुवातीच्या लॉन्चमध्ये UPI सपोर्टबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

दुसरीकडे, Bloombergचे मार्क गुरमन यांच्या रिपोर्टचा हवाला देत काही अहवालांमध्ये Apple Pay भारतात UPI सपोर्टसह येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

त्यामुळे Apple Pay च्या पहिल्या दिवसापासून UPI उपलब्ध असेल, असे सध्या ठामपणे म्हणता येणार नाही. Apple कडून भारतातील लॉन्चसंदर्भातील संपूर्ण अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

Apple Pay India
Pranit More: 370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात; प्रणित मोरे म्हणाला, 'ट्रायलला सामोरं...', काय मागणी केली?

Apple Pay ला भारतात येण्यासाठी एवढा वेळ का लागला?

Apple Pay अमेरिकेत 2014 पासून उपलब्ध आहे. मात्र, भारतातील पेमेंट नियम आणि स्थानिक डिजिटल पेमेंट इकोसिस्टम यामुळे भारतातील लॉन्चला बराच वेळ लागला.

दरम्यान, भारतात iPhone ची विक्री आणि Apple चा प्रीमियम स्मार्टफोन बाजारातील वाटा वाढला आहे. Reuters च्या माहितीनुसार, भारताच्या स्मार्टफोन बाजारात Apple ची हिस्सेदारी 2022 च्या तुलनेत वाढून सुमारे 8 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

याशिवाय, RBI कडून कार्ड पेमेंटमध्ये Face ID आणि Touch ID सारख्या बायोमेट्रिक पद्धतींना परवानगी मिळाल्याने Apple सारख्या कंपन्यांसाठी भारतात आपली पेमेंट सेवा आणण्याचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे.

PhonePe आणि Google Pay ला Apple Pay टक्कर देणार का?

Apple Pay भारतात आल्यानंतर त्याची तुलना साहजिकच PhonePe आणि Google Pay सोबत केली जाईल. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात Apple Payची कार्यपद्धती वेगळी असण्याची शक्यता आहे.

PhonePe आणि Google Pay चा भारतातील मोठा आधार म्हणजे UPI. QR कोड स्कॅन करून थेट बँक खात्यातून पैसे पाठवणे ही सुविधा भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनली आहे.

Apple Pay India
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव अचानक घसरले; सोनं ₹1,300 तर चांदी ₹1,800ने खाली; जाणून घ्या ताजे दर

त्याउलट, Apple Pay ची सुरुवात जर क्रेडिट कार्डवर आधारित झाली, तर ते प्रामुख्याने iPhone किंवा Apple Watch द्वारे कार्ड पेमेंट करण्याचे माध्यम असेल.

मात्र, भविष्यात Apple Pay मध्ये UPI जोडले गेले आणि iPhone वरून QR कोड किंवा इतर पद्धतीने UPI व्यवहाराची सुविधा उपलब्ध झाली, तर भारतातील Apple Pay चे स्वरूप बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news