नंदुरबार : पुढारीे वृत्तसेवा
राज्य शासकीय निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व राज्य निवृत्ती वेतनधारकांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दे. ना. पाटील यांनी केले आहे.
सोमवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता होणाऱ्या या पेन्शन अदालतीत प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी ) मुंबईचे अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. या अदालतीमध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. प्रधान महालेखाकार, मुंबई कार्यालयाच्या वतीने पेन्शनधारकांच्या सोयीकरता अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये साप्ताहिक ऑनलाइन पेन्शन संवाद, 24 तास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच टोल फ्री क्रमांक 1800-22-0014, तर व्हॉइस मेल क्रमांक 020-71177775, ई-मेल helpdesk.mh1ae@cag.gov.in अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र उपक्रमांची माहिती देण्यात येते, तरी सर्व निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी पेन्शन अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी पाटील यांनी केले आहे.