धुळे : पुढारी वृत्तसेवा
रावणाची प्रतिकृती दहनप्रकरणाच्या कारणावरून दोंडाईचा शहरात दोन गटांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. या संदर्भात आदिवासी समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावळ यांच्यासह जमावाच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रावण दहन कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यासह जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा शहरातील मारुती मैदानाजवळ रावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमामुळे दोन गटातील वाद चांगलाच चिघळला आहे. यासंदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आदिवासी समाजाच्यावतीने गुरुवारी, दि.6 रात्री उशिरापर्यंत दोंडाईचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. रावणदहन कार्यक्रमास हरकत घेतल्याने आमदार जयकुमार रावळ आणि त्यांच्या समर्थकांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप जमावाने केला. त्यामुळे यासंदर्भात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी जमावाची समजूत घातली. त्यानुसार शुक्रवारी, दि.7 आमदार जयकुमार रावल यांच्यासह त्यांचे वडील सरकार रावळ, तसेच निखिल राजपूत, नरेंद्र गिरासे, चिरंजीवी चौधरी, रामकृष्ण मोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रवीण महाजन, नरेंद्र राजपूत यांच्यासह 20 जणांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या वादासंदर्भात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख तसेच अमित पाटील ,रवींद्र जाधव ,नंदू सोनवणे ,युवराज सोनवणे, भारत सोनवणे, अंकुश सोनवणे ,नागेश मालचे, अर्जुन माळचे यांच्यासह जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीमध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह पाच जणांनी धार्मिक भावना दुखवण्याच्या हेतूने कट कारस्थान रचून रावण दहन कार्यक्रमात अडथळा करण्यासाठी आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांना पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रावणाच्या प्रतिकृतीचे नुकसान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वादानंतर दोंडाईचा शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे.