

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दिले. परंतु त्याला क्रिमिलेयरची अट घातली गेली. क्रीम म्हणजे मलई आणि लेयर म्हणजे खालचे. आरक्षण मलई देणाऱ्याला मिळेल खालच्याला मिळणार नाही, अशी व्यवस्था भाजप सरकारने उभी केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मंथन शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. जे आज खोटे बोलून सत्तेवर आले ते कधीही स्वातंत्र्यलढ्यात सामील नव्हते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेली घटना व संविधान अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, आज त्यावर मंथनाची गरज आहे. जो इतिहास विसरतो तो जीवनात कधीही पुढे जाऊ शकत नाही, असेही पटोले म्हणाले. यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव, राहुल यादव, शीतल चौधरी, आमदार हिरामण खोसकर, शोभा बच्छाव, एजाज बेग, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, शाहू खैरे, वत्सला खैरे, भानुदास माळी, विजय राऊत यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसींचे विविध मागण्यांचे निवेदन
१. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून वसतिगृह उपलब्ध करून द्यावे.
२. ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये दुपटीने वाढ करावी.
३. विविध निवडणुकांमध्ये आरक्षणापेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या माध्यमातून ओबीसी उमेदवारांना द्याव्यात.
४. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी केंद्र व राज्य सरकारकडे आग्रही मागणी करावी.
५. उच्च शिक्षणासाठी असलेली क्रिमिलेयरची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत.
६. ओबीसी महामंडळाच्या कर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व सुलभ पद्धतीने राबवण्यात येण्यासाठी तसेच जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यासाठी लक्ष द्यावे.
७. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंतीदिनी महिला शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.
८.क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी.
९. क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे संदर्भग्रंथ हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये छपाईसाठी निधीची तरतूद करावी.