बावडा : भीमा नदीतील पूर परिस्थिती कायम! | पुढारी

बावडा : भीमा नदीतील पूर परिस्थिती कायम!

बावडा; पुढारी वृत्तसेवा: उजनी धरणामधून भीमा नदीत सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या विसर्गामध्ये शनिवारी (दि. 17) रात्री 91 हजारांवरून 1 लाख 11 हजार क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. परिणामी, भीमा नदीची इंदापूर तालुक्यातील पूर परिस्थिती तिसर्‍या दिवशीही रविवारी (दि.18) कायम होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी नदीपात्रात 1 लाख 11 हजार 600 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू होता. भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्राच्या लगतच्या शेतातील ऊस, मका आदी पिकांमध्ये अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे.

भीमेवरील गणेशवाडी येथील इंदापूर व माढा तालुक्याला जोडणार्‍या पुलावर सुमारे 6 फूट पाणी असल्याने तिसर्‍या दिवशीही पुलावरून होणारी वाहतूक ठप्प होती. तसेच, नदीवरील भाटनिमगाव, टणू, शेवरे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली आहेत. तसेच, भीमा नदीची पूर परिस्थिती कायम असल्याने इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव, भाटनिमगाव, भांडगाव, बावडा, गणेशवाडी, पिंपरी बु., टणू, नीरा नरसिंहपूर या गावांच्या परिसरातील शेतकरी व नागरिकांना प्रशासनाने सतर्कचा इशारा दिलेला आहे.

Back to top button