पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या वादात काल सायंकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेस मारहाण केल्याने ती दगावल्याचे म्हणत नातलगांनी पोलिसात तक्रार केल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला. या घटनेने साक्रीत तणाव निर्माण झाला होता. तर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत ताराबाई राजेंद्र जगताप या पराभूत झाल्या. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचा मुलगा गोटू ऊर्फ रविंद्र राजेंद्र जगताप हा पिंपळनेर रोडवरील पुलाजवळून जात असताना मनिष गिते, रमेश सरग, उत्पल नांद्रे यांच्यासह अन्य पाच-सहा जणांनी गोटूला अडवून रहाशील का उभा ? वाद जाधव असाच पाडसू, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर उभयतात वाद झाल्याने गोटूला मारहाण करण्यात आली. यावेळी गोटूच्या मदतीसाठी त्याची बहिण माया शिवाजी पवार, भाचा विशु शिवाजी पवार, दुसरा भाचा देव रोहिदास बाबर, चुलत बहिण मोहिनी नितीन जाधव हे धावून गेले असता त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली.
यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत मोहिनी जाधव ह्या खाली पडून जागीच मरण पावल्या. या घटनेनंतर मयत मोहिनी जाधव यांच्या नातलगांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात आंदोलन करीत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर घटनेची माहिती मिळाल्याने साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोनि. दिनेश आहेर, एपीआय हनुमान गायकवाड त्याठिकाणी पोहचले. संतप्त नागरिकांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. घटनेची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरिक्षक शिवाजी बुधवंत यांनीही घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.
याप्रकरणी मयत महिलेची चुलत बहिण माया शिवाजी पवार यांच्या फिर्यादीवरून काल रात्री १२.३० च्या सुमारास मनिष गिते रमेश सरग, उत्पल नांद्रे यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि हनुमान गायकवाड तपास करीत आहेत.
हेही वाचा :