नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रस्त्यांची कामे करताना अनेक ठिकाणी चेंबर्स रस्त्याच्या खाली-वर असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता असल्याने चेंबर्स समान पद्धतीने असावेत तसेच रस्ते दुभाजकांची देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देण्याची सूचना करीत, या कामांमध्ये हलगर्जीपणा करणार्या ठेकेदारांच्या बिलातून या कामाची रक्कम कपात करण्याचे आदेश मनपा आयुक्त रमेश पवार यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.
गुरुवारी (दि. 5) आयुक्त पवार यांनी इंदिरानगर, परबनगर, उपनगर, देवळाली गाव, नाशिकरोड आदी भागांत पाहणी दौरा केला. इंदिरानगर, परबनगर येथील रस्त्यांची पाहणी करीत असताना, तेथील भुयारी गटाराचे आणि पावसाळी गटाराचे चेंबर व रस्त्याची लेव्हल एकसारखी नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. रस्ते दुभाजकाची रंगरंगोटी करून सुशोभीकरण पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. याबाबत टाळाटाळ करणार्या ठेकेदाराच्या देय बिलातून ती रक्कम कपात करावी, असे आदेशच आयुक्त पवार यांनी दिले आहेत.
काही ठिकाणी रस्त्यालगतचे अतिक्रमण वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने या पाहणी दौर्यात निदर्शन आले. त्यावेळी अतिक्रमण विभागाला शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याच्याही सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या. तसेच, अनधिकृतरीत्या दुकाने थाटून बसणार्यांवरही कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
नाशिकरोड, जेतवननगर मनपा शाळेची संरक्षक भिंत दुरुस्त करण्याबरोबरच प्रवेशद्वार बसवावे, असे पवार यांनी सांगितले. देवळालीगाव येथील सुन्नी मुस्लीम कब्रस्तान येथील संरक्षक भिंतीचे काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी शहर अभियंता नितीन वंजारी, जितेंद्र पाटोळे, उपअभियंता नीलेश साळी, विभागीय अधिकारी सुनील आव्हाड आदींसह अधिकारी उपस्थित होते.
नाशिकरोडलाही पाहणी
उपनगर येथील क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी करताना मैदानी खेळासाठी आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात येऊन काँक्रिटीकरणाची कामे रद्द करण्याची सूचना केली. देवळाली गाव स्मशानभूमी येथे पाहणी करताना विद्युतदाहिनीचे काम हाती घ्यावे व नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या शेडची दुरुस्ती करण्याची सूचनाही त्यांनी केली.