कराड : शिवजयंती हिंदू एकता आंदोलनाची की भाजपाची? | पुढारी

कराड : शिवजयंती हिंदू एकता आंदोलनाची की भाजपाची?

कराड : पुढारी वृत्तसेवा

कराड येथे शिवजयंतीप्रसंगी काढण्यात आलेली दरबार मिरवणूक ही हिंदू एकता आंदोलनाने घेतली होती की भाजपाने काढली होती असा प्रश्न तमाम कराडकर यांना पडलेला आहे. दरबार मिरवणुकीमध्ये सर्व जाती-धर्माचे सर्व पक्षाचे लोक सहभागी झाले होते हे कराडकर यांनी पाहिले आहे. अशा वेळी विक्रम पावसकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावून त्यांना जनसमुदायासमोर बोलायला लागून ही शिवजयंती जणू भाजपचीच आहे, असा आभास तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न कराडकर यांच्या जिव्हारी लागला असून शिवजयंतीमध्ये राजकारण आणल्यास यापुढे आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे कराड शहर प्रमुख शशिराज करपे यांनी दिली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शशिराज करपे बोलत होते. यावेळी कराड उपशहर प्रमुख अक्षय गवळी, कराड उपशहर प्रमुख शेखर बर्गे उपस्थित होते.

शशिराज करपे म्हणाले, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे. यापूर्वी आम्ही शिवजयंती मध्ये सामील होतो त्यावेळी आम्ही लावलेला डॉल्बी विनायक पावसकर यांना खटकला होता. तो त्यांनी आम्हाला काढायला भाग पाडले. शिवजयंतीमध्ये डॉल्बी लावणे व त्यावर थिरकणे हे आपल्याला शोभा देत नाही असे त्यांनी आम्हाला हक्काने सुनावले होते, आम्हीही ते हक्काने स्वीकारले होते. मात्र त्यांचे वारसदार विक्रम पावसकर डीजे लावून हजारो तरुणांना त्यावर थिरकायला लावून स्वत:ही त्यावर थिरकत होते हे विनायक पावसकर यांनी कसे काय स्विकारले? याचे उत्तर विनायक पावसकर यांनी द्यावे. कराड शहराने आजपर्यंत सामाजिक सलोखा राखला आहे. शिवजयंती मध्ये सर्व जातीधर्माचे बांधव आपापल्या परीने योगदान देतात. अशावेळी शिवजयंती मध्ये इतरांच्या भावना दुखवण्यासारख्या घोषणा दिल्या जातात याचे उत्तर विक्रम पावसकर यांनी देणे अपेक्षित आहे.

लोकवर्गणीमधून साजरी होणारी शिवजयंती विनायक पावसकर यांच्या नेतृत्वाखाली पन्नास वर्षे चांगल्या पद्धतीने सर्व पक्षातील लोकांना निमंत्रित करून साजरी होत होती. यावेळीही मिरवणुकीत आमच्यासह शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे, महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई जाधव, साजिद मुजावर, मयूर देशपांडे, अक्षय मोहिते शंभूराजे, जोतीराम साळी तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते. पण या मिरवणुकीत भाजपाचे लोकांना निमंत्रण दिले गेले. अन्य राजकीय पक्षातील लोकांना निमंत्रण दिले नाही अशी चर्चा सर्व पक्षातील लोकांनी केली आहे. नागरिकांमध्येही ही चर्चा आहे.

शिवजयंतीमध्ये निर्माण केलेल्या आभासाबाबत संयोजकांनी काहीतरी बोध घ्यावा. शिवजयंतीला भाजपाचा रंग देणे कितपत योग्य आहे याचा विचार करावा नाहीतर कराडकरांना वेगळा विचार करावा लागेल, असाही इशारा करपे यांनी दिला.

Back to top button