खासदार हेमंत गोडसे : साखर कारखानदारीला आले गोड दिवस

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खासदार हेमंत गोडसे. समवेत मान्यवर.(छाया : उमेश देशमुख)
नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खासदार हेमंत गोडसे. समवेत मान्यवर.(छाया : उमेश देशमुख)

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
ऊस शाश्वत भाव असलेले देशातील एकमेव पीक असून, केंद्र शासनाने साखरेबरोबरच उपपदार्थनिर्मितीला चालना देत, इथेनॉलचा इंधनामध्ये 20 टक्के वापर करण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी ऊस पिकाला प्राधान्य देताना जास्तीत जास्त टनेज देणार्‍या ऊसाची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

नासाका व दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक शेरझाद पटेल, सागर गोडसे, निफाडचे संचालक बी. टी. कडलक, सरव्यवस्थापक बी. एन. पवार, सरव्यवस्थापक एस. जे. इंगवले उपस्थित होते. यावेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ. भरत रासकर म्हणाले, गत 90 वर्षांत ऊस संशोधन केंद्रामार्फत ऊसाचे 16 वाण विकसित करण्यात आले आहेत. त्यात वेळोवेळी आधुनिकतेला वाव दिलेला आहे. देशातील 72 टक्के क्षेत्रात झालेली ऊस लागवड ही पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊसाची आहे. आधुनिक पद्धतीने ऊस शेती केल्यास एकरी 120 टनांपेक्षा अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते. हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी सिद्ध केलेले आहे. डॉ. अरुण देशमुख यांनी अतिरिक्त पाण्याचा होणारा र्‍हास व नापीक होणारी जमीन यामुळे ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याचे सांगितले. डॉ. किरण ओंबासे यांनी सुधारित तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. मंगेश बडगुजर यांनी ऊसावरील रोग व कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. मेळाव्यास माजी चेअरमन तानाजी गायधनी, विलास आडके, कैलास टिळे, बाबूराव मोजाड, नारायण मुठाळ आदींसह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news