पिंपरी : नोकरी, करिअरसाठी उशिरा लग्न करण्याकडे वाढतोय कल | पुढारी

पिंपरी : नोकरी, करिअरसाठी उशिरा लग्न करण्याकडे वाढतोय कल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : नोकरी व करिअर करण्याच्या नादात हल्ली उशिरा लग्न करण्याकडे कल वाढू लागला आहे. त्याचबरोबर, आपल्या जीवनैशलीत कमालीचे बदल झाले आहेत. कामाचा ताण वाढला आहे. आयटी क्षेत्रात बर्‍याच वेळा कामाचे तास हे रात्रपाळीचे असतात. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. व्यायामाकडे दुर्लक्ष केले जाते. या सर्व कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक जोडप्याने वेळीच काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

वंध्यत्वाचे नेमके कारण काय?
उशिरा होणारे लग्न हे वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे. महिलांचे वय तीसपेक्षा जास्त असेल तर गर्भधारणेस अडचणी येतात. यामध्ये बीज तयार न होणे, ते परिपक्व नसणे आदी कारणांमुळे गर्भधारणा होत नाही. लठ्ठपणा, जंकफूड खाणे, व्यसनाधीनता यामुळे वंध्यत्व निर्माण होऊ शकते.

काय काळजी घ्याल?
जोडप्यांनी 25 ते 30 वर्षे वयोगटामध्ये बाळासाठी कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच लग्न जर उशिरा झाले असेल तर जोडप्यांनी बाळाचा पर्याय पुढे ढकलू नये. तसेच महिला व पुरुष दोघांनीही जंकफूड खाणे टाळावे. मद्यपान व धूम्रपान करणेही टाळावे.

वंध्यत्वाला पुरुषही जबाबदार
वंध्यत्व म्हटले की त्याला फक्त महिलाच जबाबदार आहे, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र, काही वेळेस त्यासाठी पुरुषही जबाबदार असतात. वाढती व्यसनाधीनता दैनंदिन कामाचा वाढता व्याप, पुरेशी झोप नसणे तसेच व्यायामाचा अभाव यामुळे पुरुषांमधील शुक्राणूची संख्या कमी होते.

डॉक्टरांचे मार्गदर्शन गरजेचे
लग्नाच्या एक वर्षानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर न करता, मूल होत नसेल तर वंध्यत्व असण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा वंध्यत्व तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उशिराने होणारे लग्न याचबरोबरीने कामाचा वाढता ताण, रात्रपाळीचे काम, त्यामुळे झोप न होणे, जंकफूडला जास्त प्राधान्य देणे, अवेळी झोप, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याबाबत जोडप्यांनी वेळीच जागरुक होऊन पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.

                  – डॉ. कुणाल शिंदे, स्त्रीरोग तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

Back to top button