रमजाननिमित्त बहरली मालेगावची बाजारपेठ

रमजान ईद, www.pudhari.news
रमजान ईद, www.pudhari.news
Published on
Updated on

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा

गुरुवारी (दि. २३) चंद्रदर्शन झाल्यास शुक्रवार (दि. २४) पासून मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला प्रारंभ होणार आहे. आगामी महिनाभर शहराच्या पूर्व भागात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. त्यामुळे शहरात चैतन्याचे वातावरण आहे. यंदा रमजान ईद उत्साहात साजरी होताना मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.

गुरुवारी चंद्रदर्शन झाल्यास रात्रीपासून तरावीहच्या नमाजला सुरुवात होईल. गरजेच्या वस्तू खरेदीसाठी मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. सहेरी, रोजा इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम महिनाभर चालतील. चंद्रदर्शनानुसार शुक्रवारपासून रमजानच्या पहिल्या रोजाला प्रारंभ होईल. रोजा सोडण्यासाठी खजूर व फळांचा वापर होतो. त्यामुळे विविध प्रकारचे खजूर व फळे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होऊ लागले आहेत.

कपडे, चप्पल, बूट, सौंदर्य प्रसाधने आदी साहित्य दुकानदारांनी साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. रमजान पर्वात शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम बांधव पसंती देतात. कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधनांच्या किमतीत वाढ झाली आहे. महागाई वाढल्याचा परिणाम जाणवत असला, तरी रमजान मालेगाव शहराच्या वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंत्रमागाचा खडखडाट वाढल्याने यावर्षी नागरिकांमध्ये रमजान पर्वाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. सरदार चौक, मोहंमद अली रोड, भिक्कू चौक, इकबाल डाबी, जाफरनगर चौक, नवीन बस स्थानकाजवळ हातगाड्यांवर फळ आदी साहित्य विक्रेत्यांनी भाऊगर्दी केली आहे.

रमजान काळात संपूर्ण महिनाभर ईदच्या खरेदीची धामधूम असते. शहरातील गांधी मार्केट, किदवाई रोड, मोहंमद अली रोड, अंजूमन चौक, एकबाल डावी या प्रमुख ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होते. या भागात कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. रमजान महिन्यात मालेगावी खरेदीसाठी जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार, नगर आदी जिल्ह्यांतून खरेदीसाठी नागरिक येत असतात. यावर्षी कपडे व इतर खरेदीसाठी बाजारपेठेत शब-ए-बारातपासूनच गर्दी होत आहे.

उपासनेला महत्त्व :

रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर उपवास केले जातात. सहेरी झाल्यानंतर इफ्तारच्या वेळेपर्यंत अन्न, पाणी ग्रहण केले जात नाही. इमान, नमाज, रोजा, हज, जकात असे पाच महत्त्वपूर्ण अरकान आहेत. इस्लाममध्ये पाच अरकानांपैकी रोजा एक मानला जातो. रमजानचे पहिले १० दिवस ईश्वरी कृपेचे मानले जातात. पुढील १० दिवस भक्तीचे व उर्वरित १० दिवसांमध्ये रोजेदाराचे संरक्षण केले जाते. शवे कद्र व बरकतवाली रात या दोन रात्रीचे महत्त्व आहे. रमजान महिन्यात उपासनेला फार महत्व असून दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करणे महत्त्वपूर्ण मानले जाते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news