

Bhusawal Burglary
जळगाव : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत भडगाव आणि भुसावळ येथे दोन मोठ्या चोरीच्या घटना घडवल्या आहेत. भडगावमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली, तर भुसावळमध्ये भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याच्या बंद घरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
भडगाव-चाळीसगाव रस्त्यावरील हॉटेल वैभवजवळ २१ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता ही घटना घडली. होंडा युनिकॉर्न आणि होंडा शाईन (क्रमांक एमएच-३९-झेडजे-५०७०) या दोन दुचाकींवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी शेतकरी देवेंद्रसिंह वसंत पाटील (वय ६३, रा. वडगाव बुद्रुक, ता. भडगाव) यांना लक्ष्य करत त्यांच्या ताब्यातील २ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
या प्रकरणी देवेंद्रसिंह पाटील यांच्या फिर्यादीवरून २२ जुलै रोजी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक २३६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवाडे करीत आहेत.
भुसावळ शहरातील सहकार नगर परिसरातील 'एकदंत अपार्टमेंट'मध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (हिऱ्यासारखा खडा असलेली), २५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातल्यांची जोडी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, दोन जोड चांदीचे पैजण, चांदीचे ब्रेसलेट तसेच चांदीची साखळी आणि पेंडंट यांचा समावेश आहे.
या प्रकरणी राहुल सोधान तोमर (वय ३६), वरिष्ठ अभियंता, भारतीय रेल्वे, रा. प्लॉट क्रमांक २, एकदंत अपार्टमेंट, सहकार नगर, भुसावळ यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक १५५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५(A), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, याच दिवशी शेजारील नीलकंठ अपार्टमेंटमधील रहिवासी जयगोविंदा लक्ष्मण पलई यांच्या घरातही चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकाच परिसरातील दोन घरे चोरट्यांनी लक्ष्य केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
भडगाव आणि भुसावळ येथील दोन्ही घटनांतील आरोपी अद्याप फरार असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.