

जळगाव : जळगावच्या नवीन बसस्थानक परिसरातून महागडा 'आयफोन' चोरणाऱ्या एका विधीसंघर्ष बालकाला जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांबापुरा भागातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २९ मे रोजी चोरीला गेलेल्या १ लाख ३२ हजार रुपये किंमतीच्या आयफोन १७ प्रो सह विविध कंपन्यांचे एकूण ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ७१ हजार ५०० रुपये आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संकेत सुरेश नारखेडे हे २९ मे रोजी काही कामानिमित्त जळगाव नवीन बसस्थानकावर आले होते. बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १ लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीचा ' एप्पल' कंपनीचा आयफोन १७ प्रो मोबाईल अत्यंत चलाखीने लांबवला होता. याप्रकरणी संकेत नारखेडे यांनी ४ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा (रजि.क्र. १९०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
बसस्थानकावरून महागडा आयफोन चोरीला गेल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पथकाने जळगावच्या तांबापुरा परिसरातून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाची सखोल चौकशी केली असता, त्याने बसस्थानकावरून आयफोन चोरल्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून चोरीचा आयफोन आणि इतर ठिकाणांहून चोरलेले ४ असे एकूण ५ मोबाईल पोलिसांनी जप्त केले. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण वानखेडे, रवींद्र ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर, अमित मराठे आणि प्रवीण जाधव यांच्या पथकाने केली आहे.