

नागाव : शिरोली एमआयडीसी येथील कोल्हापूर अॅक्सलच्या मागे असणाऱ्या स्काय टेक्नॉलॉजी आणि एस.व्ही. इंजिनिअरिंग सोल्युशन्स या दोन कंपन्यात अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर तोडून तब्बल ३० लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहेत. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे सलग दुसऱ्यांदा चोरी करून जवळपास अर्धा कोटी रुपये किमतीचे टुल्स साहीत्य चोरट्यांनी लांबल्यामुळे उद्योजक हवालदिल असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक दिनकर ढेकळे (रा. माने पार्क, सरोबतवाडी, कोल्हापूर) आणि त्यांची पत्नी यांची शिरोली एमआयडीसी येथे स्काय टेक्नॉलॉजी आणि एस.व्ही. इंजिनिअरिंग सोल्युशन्स या नावाच्या दोन फर्म्स आहेत. ५ जून रोजी सायंकाळी ६.३० ते ६ जून रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या इमारतीचे शटर आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी इमारतीच्या माळ्यावर असलेल्या लोखंडी कपाटांचे लॉक तोडून त्यातील महागडे कारबाइड इन्सर्ट आणि टूल्स चोरले. यात स्काय टेक्नॉलॉजीचे १६ लाख ७३ हजार ८६४ रुपयांचे (४,१९७ नग) आणि एस.व्ही. इंजिनिअरिंग सोल्युशन्सचे १२ लाख २० हजार ६७१ रुपयांचे (२,७०३ नग) साहित्य लंपास करण्यात आले आहे.
सकाळी आपल्या कंपनीत आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात येताच विवेक ढेकळे यांनी तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलिसांत जाऊन घडलेला प्रकार सांगितला पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
शिरोली एमआयडीसीमध्ये मागील दोन दिवसांत चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी ५० लाखांहून अधिक रकमेचा ऐवज लंपास केला आहे. वारंवार होणाऱ्या या चोरीच्या प्रकारांमुळे स्थानिक उद्योजक हवालदिल झाले आहेत. कंपन्यांमधील साहित्य सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सराईत गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे, हे आता स्थानिक पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.