

इंद्रजित शिंदे
पन्हाळा : कोलोली (ता. पन्हाळा) येथील शेतात महिला शेतकरी छबुताई सर्जेराव पाटील (वय ५५) यांचा धारदार शस्त्राने वार करून झालेला क्लीष्ट खून उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. छबुताई यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न यशस्वी न झाल्यानेच आरोपी अंकुश हणमंत पाटील (वय ५१, रा. कोलोली) याने त्यांची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपासासाठी पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ११ च्या सुमारास छबुताई पाटील या कोलोली गावच्या हद्दीतील मासुलकी नावाच्या शेतात काम करत होत्या. यावेळी अज्ञात कारणासाठी एका इसमाने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी बाबासो श्रीपती पाटील (रा. कोलोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडलेले ठिकाण हे गावापासून दूर आणि दुर्गम भागात असल्याने या खुनाचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार सपोनि सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे आणि एलसीबीच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाला सुरुवात केली.
गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यात गावातीलच अंकुश हणमंत पाटील याचा सहभाग असल्याबाबात माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ मे रोजी त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी आणले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने रात्री उशिरा गुन्ह्याची कबुली दिली.
मयत छबुताई पाटील या शेतात एकट्या असल्याचे पाहून आरोपी अंकुश याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, छबुताई यांनी त्याला कडाडून विरोध केला. या विरोधाने संतप्त झालेल्या अंकुशने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार केले. आरोपी अंकुश पाटील यास गुन्हयाच्या पुढील तपासकामी पन्हाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोनि नामदेव शिंदे, सपोनि सागर वाघ, फौजदार संतोष गळवे, लक्ष्मण सरगर तसेच एलसीबीच्या अंमलदारांच्या पथकाने केली आहे.