SIR Jalgaon | ‘अडकावले’ की ‘वगळले’? जळगाव जिल्ह्यात ५ लाख मतदारांच्या नावावर टांगती तलवार?

मतदार यादी पुनरीक्षणात ४ लाख ८७ हजार गणनापत्रके अप्राप्त; जळगाव जिल्ह्यात ३२ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित
Voter List Revision Jalgaon
Voter List Revision JalgaonPudhari AI
Published on
Updated on

Voter List Revision Jalgaon

जळगाव : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ८७ हजार ३८९ मतदारांच्या नावांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील मतदार यादीच्या पडताळणीचे काम ९८.९९ टक्के पूर्ण झाले असले, तरी १३.७२ टक्के मतदारांचे गणनापत्रक (Enumeration Form) अद्याप बूथ लेव्हल ऑफिसरकडे (BLO) जमा झालेले नाही. त्यामुळे हे मतदार नेमके अनुपस्थित, स्थलांतरित, मयत किंवा दुबार नोंद असलेल्या प्रवर्गातील आहेत का, याची पडताळणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे. BLOकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेत मोठ्या संख्येने गणनापत्रके अद्याप प्राप्त न झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Voter List Revision Jalgaon
Jalgaon News : भूमिपूजनाचा फुसका बार की भुसावळकरांच्या जखमेवर मीठ? अमृत-१ चे काम अधूनच, तरीही अमृत-२ ची कुदळ मारली

ASDD मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर

अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मयत (Dead) आणि दुबार (Duplicate) अशा ASDD प्रवर्गातील मतदारांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या यादीत आपले नाव आहे का, याची तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

एखाद्या मतदाराचे नाव चुकीने या प्रवर्गात समाविष्ट झाले असल्यास संबंधित BLO किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक EF फॉर्म भरावा. त्यामुळे संबंधित मतदाराची नोंद तपासून आवश्यक दुरुस्ती करता येणार आहे. नागरिकांनी वेळेत कार्यवाही न केल्यास मतदार यादीतील नावाबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात.

Voter List Revision Jalgaon
Jalgaon Murder Case | संपत्ती अन् विम्याच्या पैशांसाठी सख्ख्या भावजईची कुऱ्हाडीने हत्या; नराधम दिराला जन्मठेपेची शिक्षा!

३२ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित

दरम्यान, मतदारांची वाढती संख्या आणि मतदान केंद्रांवरील ताण लक्षात घेऊन जिल्ह्यात ३२ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापूर्वी एका मतदान केंद्रावर कमाल १,५०० मतदारांची मर्यादा होती. आता ही मर्यादा १,२०० मतदारांपर्यंत करण्यात आली आहे.

नवीन मतदान केंद्रांचा प्रस्तावित तपशील असा आहे :

चाळीसगाव : ९

जामनेर : ५

चोपडा : ४

मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ : प्रत्येकी ३

एरंडोल, पाचोरा : प्रत्येकी २

जळगाव ग्रामीण : १

याशिवाय पाच मतदान केंद्रांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून, नऊ मतदान केंद्रे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. २४ ऑगस्टपासून सहा क्रमांकाच्या फॉर्मचे वितरण सुरू होणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.

Voter List Revision Jalgaon
Jalgaon Farmers Children Hostel | पोशिंदा हरपला, पण भविष्य अंधारू देणार नाही; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी जळगावात वसतिगृह

नाव तपासा, मतदानाचा हक्क अबाधित ठेवा

मतदारांनी प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले नाव आणि संबंधित तपशील तपासून पाहावेत. नोंदीत काही त्रुटी आढळल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. मतदारांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news