Jalgaon Farmers Children Hostel | पोशिंदा हरपला, पण भविष्य अंधारू देणार नाही; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी जळगावात वसतिगृह

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संवेदनशील उपक्रमाला मनपा आयुक्तांची साथ; खासगी क्लासेसकडूनही मदतीचा हात
Jalgaon Hostel For Farmers Children
Jalgaon Hostel For Farmers ChildrenAI photo
Published on
Updated on

Jalgaon Hostel For Farmers Children

जळगाव : शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकटासोबतच मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहतो. विशेषतः शहरात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे, यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी जळगाव शहरात स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त आणि पितृछत्र हरवलेल्या शेतकरी कुटुंबांतील ४६ विद्यार्थ्यांशी नुकताच थेट संवाद साधला. या संवादातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. घरातील प्रमुख कमावती व्यक्ती गमावल्यानंतर शहरात राहण्याचा खर्च, शिक्षणाची फी, भोजन आणि अन्य शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येत असल्याचे या संवादातून समोर आले.

Jalgaon Hostel For Farmers Children
Jalgaon Murder Case | संपत्ती अन् विम्याच्या पैशांसाठी सख्ख्या भावजईची कुऱ्हाडीने हत्या; नराधम दिराला जन्मठेपेची शिक्षा!

पहिल्या टप्प्यात ४० विद्यार्थ्यांची व्यवस्था

विद्यार्थ्यांच्या या अडचणींची दखल घेत जिल्हाधिकारी घुगे यांनी तातडीने स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ४० विद्यार्थ्यांना या वसतिगृहात निवास आणि शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

मनपा आयुक्तांची सकारात्मक भूमिका

वसतिगृहासाठी जागेची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी घुगे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने यांच्याशी चर्चा केली. या उपक्रमाला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका क्षेत्रातील एक इमारत वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

Jalgaon Hostel For Farmers Children
Jalgaon Crime | संपत्तीच्या हव्यासातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप

खासगी क्लासेसही मदतीला

विद्यार्थ्यांना केवळ निवासाची सुविधा मिळवून देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील स्पर्धा परीक्षा आणि अन्य खासगी क्लासेसच्या संचालकांशी संवाद साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही खासगी क्लासचालकांनी विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे.

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर जावे लागू नये, त्यांना सक्षमपणे पुढे जाण्याची संधी मिळावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी चर्चा केल्यानंतर आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणाच्या वाटा बंद होत असल्याचे दिसून आले. या मुलांचे भविष्य अंधारमय होऊ नये आणि त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे, याच उद्देशाने शहरात स्वतंत्र वसतिगृह सुरू करत आहोत.

— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news